भंडारा जिल्ह्यात पुराचा कहर; १८० कुटुंबांचे स्थलांतर | पुढारी

भंडारा जिल्ह्यात पुराचा कहर; १८० कुटुंबांचे स्थलांतर

भंडारा; पुढारी वृत्तसेवा : गेल्या तीन दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे भंडारा जिल्ह्यात पुरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक सखल भागांत पावसाचे पाणी शिरल्याने सुमारे १८० कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. मंगळवारी सकाळपासून पावसाने उसंत घेतली असली तरी अद्यापही पुरस्थिती कायम असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने वैनगंगा नदीला पूर आला आहे. भंडारा येथील वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने शहराजवळच्या सखल भागात पुराचे पाणी शिरले. भंडारा शहर परिसरात असलेल्या गणेशपूर, भोजापूर, गणेशनगरी भागात पुराचे पाणी शिरले आहे.

आतापर्यंत भंडारा शहरासह जिल्ह्यातील १८० कुटुंबांना जिल्हा परिषदेच्या शाळा आणि सभागृहात हलविण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून ‘एसडीआरएफ’ व जिल्हा शोध बचाव पथक सक्रीय करण्यात आले आहे. वैनगंगा नदीजवळ असलेल्या ठोक भाजी बाजारात पाणी शिरल्याने शहरासह नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यात होणारा भाजीपाल्याचा पुरवठा प्रभावित झाला आहे. वैनगंगा नदीची पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी गोसेखुर्द धरणाचे ३३ दरवाजे उघडण्यात आले असून, सध्या १७ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पुराच्या पाण्यामुळे जिल्ह्यातील सुमारे ८२ प्रमुख मार्ग व ग्रामीण मार्ग बंद आहेत.

हेही वाचा :

Back to top button