

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : येत्या चार दिवसांत मराठा आरक्षणाच्या मागण्या संदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री भांबेरी येथील उपोषणकर्त्यांच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेऊन चर्चा करणार आहेत, असे लेखी आश्वासनाचे पत्र कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना दिले. मराठा आरक्षण मागण्यासाठी गेले ८ दिवस भांबेरी शिष्टमंडळाचे उपोषण सुरू होते. १५ ऑगस्ट रोजी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते मनोज जरांगे यांनी पाणी घेऊन उपोषण सोडले.
यावेळी कृषीमंत्री सत्तार म्हणाले की, आपल्या मागण्या रास्त आहेत. मराठा आरक्षण संदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भावना सकारात्मक आहे. चार- पाच दिवसात इतका धोरणात्मक निर्णय घेणे शक्य नाही. त्यासाठी मराठा आरक्षण संदर्भात ज्या मागण्या आहेत त्याला कायदेशीर बाबीत बसविण्यासाठी वेळ द्यावा लागेल. तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सर्व मंत्री आपल्या मताशी सहमत असून कुठलाही अन्याय होणार नाही, अशी भूमिका सरकारची राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या चार- पाच दिवसांत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी आपली बैठक घेऊन सकारात्मक चर्चा होईल. न्यायालयाची अडचण जर नाही आली तर ७० टक्के मागण्या मंजूर करू, असेही आश्वासन कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.
यावेळी माजी मंत्री अर्जुन खोतकर,आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, तहसीलदार विद्याचरण कडवकर उपोषणकर्ते, सकल मराठा समाज व भांबेरी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.