

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात एनएसईमधील फोन टॅपिंग प्रकरणात आरोपी असलेले मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांना दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी जामीन दिला. एनएसईमधील घोटाळा, फोन टॅपिंग तसेच हवाला प्रकरणाचा तपास सध्या तपास संस्थांकडून सुरु आहे.
संजय पांडे आणि त्यांच्या आयसेक सर्विसेस प्रा. लि. नावाच्या कंपनीविरोधात सीबीआयने भारतीय दंड संहिता, भारतीय टेलिग्राफ कायदा तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल केलेले आहेत. यानंतर हवालाच्या संशयातून सक्तवसुली संचलनालयाने देखील स्वतंत्रपणे चौकशीला सुरुवात केली होती. ईडीने प्राथमिक चौकशीनंतर 19 जुलै रोजी संजय पांडे यांना अटक केली होती. यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली होती.
ऑगस्ट महिन्यात कनिष्ठ न्यायालयाने पांडे यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. एनएसईमधील कर्मचारी वर्गाचे फोन टॅप करण्यात त्यांचा सहभाग असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याची टिप्पणी त्यावेळी न्यायालयाने केली होती. वर्ष 2006 नंतर पांडे हे एनएसई अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकांत सामील झाल्याचेही दिसून आले होते.
.हेही वाचा