

मिरज : स्वप्निल पाटील : कोल्हापूर जिल्ह्यातील आठ जणांना विठ्ठलाच्या दर्शनाची आस लागली होती. विठ्ठलाचा धावा करत सर्वजण पंढरपूरला दर्शनासाठी निघाले होते. सर्वजण प्रवास करूही लागले परंतु विठ्ठलाच्या दर्शनापूर्वीच सहा जणांना मृत्यूने कवटाळले. त्यामुळे काही क्षणातच होत्याचे नव्हते झाले.
जयंवत पोवार यांचे कुटुंब सरवडे (ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) गावचे. ते मुद्रांक लेखनीक म्हणून काम करून उदरनिर्वाह चालवित. तुटपुंजी कमाईतून ते दोन मुलींचे व एका मुलाचे करिअर घडविण्याचे स्वप्ने रंगवित होते. पवार कुटुंबीय धार्मिक असल्याने विठ्ठलाच्या चरणावर डोके ठेवण्यासाठी ते जाणार होते. जयवंत यांनी पत्नी स्नेहल, मुलगा सोहम, मुलगी साक्षी, श्रावणी, सासू कमल शिंदे आणि सासूचे दीर लक्ष्मण शिंदे यांचा गोतावळा जमविला. त्यानुसार पंढरपूरला जाण्यासाठी बुधवारचा वार ठरला. ठरल्यानुसार भाड्याने घेतलेली गाडी घेवून कुटुंबासमवेत इचलकरंजी येथे पोहोचले. तेथून नातेवाईकांना घेवून ते पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघाले.
जयवंत यांचे इनामधामणी येथे देखील नातेवाईक आहेत, त्यांच्या भेटीसाठी देखील ते जाणार होते, परंतु त्यांचा काळ पुढे वाट पाहत होता. ऐनवेळी त्यांनी नातेवाईकांकडे जाण्याचे टळले, अन् सर्वजण पंढरपूरच्या दिशेने निघाले. अवघ्या काही अंतरावर जावून त्यांनी प्रवासातील निम्मा टप्पा पार केला. विठुरायाचे चरण 133 किलोमीटरवर राहिले होते. त्यामुळे संपूर्ण कुटुंब खूष होते.
याचवेळी मिरजेजवळ काळ दबा धरून बसला होता. पवार यांचे वाहन पंढरपूरच्या दिशेने जात असताना समोरून रस्त्याच्या विरुद्ध दिशेने येणार्या ट्रॅक्टरवर जावून भरधाव वेगाने आदळली. बोलेरो ट्रॅक्टरवर आदळताच वाहनात एकच आक्रोश झाला, अन् तो काही क्षणात शांत देखील झाला. पाच जणांची अपघातात डोकी फुटली.
अपघातात गंभीर जखमी झालेले मायलेकी आरडाओरडा करीत मदतीसाठी धावा करीत होत्या. महामार्गावरून जाणार्या व घटनास्थळी राहणार्या रहिवाशांनी तत्काळ धाव घेतली. तिघांचा जीव वाचविण्यासाठी धडपड सुरू झाली. तिघांना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकेला देखील कळविण्यात आले. परंतु हा प्रयत्न देखील काळाला मान्य नव्हता. रुग्णवाहिका आली, तिघांना त्यामध्ये घातले. परंतु रुग्णवाहिका सुरूच झाली नाही, त्यामुळे दुसरी रुग्णवाहिका देखील आली, त्यामध्ये मायलेकींसह मुलाला देखील रुग्णवाहिकेत घालण्यात आले, परंतु हे देखील नियतीला मान्य नसावे. हळहळायला लावणारी घटना म्हणजे दुसरी रुग्णवाहिका देखील बंद पडली. त्यानंतर तिसरी रुग्णवाहिका बोलवली त्यातून सर्वांना रुग्णालयात नेलेे. गंभीर जखमी झालेल्या स्नेहल पवार या जगण्यासाठी धडपडत होत्या, त्यासाठी डॉक्टर देखील शर्थीने प्रयत्न करीत होते. परंतु काही कालावधीनंतर स्नेहल यांची प्राणज्योत मालवली.
पोवार यांच्या लेकी मात्र मृत्यूशी झुंज देत आहेत. त्या बिचारींना आई-वडील आणि आपल्या पाठीवरील भाऊ या जगात नाहीत, याची पुसटशी कल्पना देखील नाही. काहीतरी झालं आहे, आपल्या कुटुंबावर विविध ठिकाणी उपचार सुरू आहे, अशीच समजुतीतून बहिणी-बहिणी मृत्यूशी झुंज देत आहेत. त्यांना जन्मदाते आणि पाठच्या लाडक्या भावाचे शेवटचे पाहताही आले नाही.
राष्ट्रीय महामार्गावरील अपघात इतका भीषण होता की, बोलेरो रक्ताने माखली होती. सर्वत्र रक्त पसरले होते. मृतदेह बाहेर काढल्यानंतर बोलेरोमधून अक्षरश: रक्ताची धार लागली होती. बोलेरोमधून रस्त्यावर पडणारी रक्ताची धार पाहून उपस्थित सुन्न झाले होते.
हेही वाचा :