Sangli Accident news | ब्रेक लावलाच नाही! मिरजेतील अपघातात ६ ठार | पुढारी

Sangli Accident news | ब्रेक लावलाच नाही! मिरजेतील अपघातात ६ ठार

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  मिरजेत बोलेरो आणि ट्रॅक्टरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात सहाजण ठार झाले. यापैकी पाचजण जागीच ठार झाले, तर एका महिलेचा रुग्णालयात मृत्यू झाला. रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी सकाळी सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. दोघे मृत इचलकरंजीचे, तर अन्य मृत सरवडे (ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) गावचे आहेत. दोन जखमी तरुणींची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. (Sangli Accident news)

जयवंत दत्तात्रय पोवार (वय 43), पत्नी स्नेहल जयवंत पोवार (38), त्यांचा मुलगा सोहम जयवंत पोवार (12, सर्व रा. सरवडे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर), जयवंत पोवार यांच्या सासू कमल श्रीकांत शिंदे (60, रा. इचलकरंजी) आणि कमल यांचे दीर लक्ष्मण शंकर शिंदे (65, मूळ रा. इचलकरंजी, सध्या रा. अहमदाबाद, गुजरात) व चालक उमेश उदय शर्मा (22, रा. शेळेवाडी, जि. कोल्हापूर) यांचा या भीषण अपघातात मृत्यू झाला. जयवंत यांच्या मुली साक्षी पोवार (18) आणि श्रावणी पोवार (16) या गंभीर जखमी झाल्या आहेत.

सरवडे येथील जयवंत पोवार मुद्रांक लेखनिक पदावर कार्यरत आहेत. त्यांचे कुटुंबीय बुधवारी पंढरपूरला विठ्ठल-रुक्मिणी दर्शन करून सायंकाळपर्यंत परत येणार होते. त्याप्रमाणे सरवडे येथून पत्नी, मुलगा आणि एक मुलगी यांना, तर इचलकरंजी येथून त्यांची दुसरी मुलगी, सासू कमल व त्यांचे दीर लक्ष्मण यांना सोबत घेऊन प्रवास सुरू केला. त्यासाठी त्यांनी बोलेरो भाड्याने घेतली होती. ही बोलेरो (एम.एच. 09 डीए 4912) सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास मिरजेजवळ आली आणि रस्त्याच्या विरुद्ध दिशेने वीट घेऊन भरधाव वेगाने येणार्‍या ट्रॅक्टरवर (एम.एच. 10 डीजी 8683) जाऊन आदळली. अपघात इतका भीषण होता की, दोन्ही वाहने एकमेकांमध्ये घुसली. ट्रॅक्टरचे पुढील चाक तुटून ते पाठीमागील चाकापर्यंत पोहोचले. बोलेरोचा चक्काचूर झाला. समारोसमोर जोरदार धडक झाल्याने बोलेरोमधील जयवंत यांच्यासह सोहम, कमल, लक्ष्मण आणि चालक उमेश जागीच ठार झाले. स्नेहल, साक्षी आणि श्रावणी या गंभीर जखमी झाल्या. स्नेहल यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रॅक्टरचालकाने घटनास्थळावरून पळ काढला.

अपघात घडताच स्थानिकांनी व राष्ट्रीय महामार्गावरील प्रवाशांनी जखमींना रुग्णवाहिकेतून मिरज शासकीय रुग्णालयात तत्काळ दाखल केले. साक्षी आणि श्रावणी यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. मिरज शासकीय रुग्णालयात रात्री उशिरापर्यंत शवविच्छेदन करण्याचे काम सुरू होते. घटनास्थळी पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, उपअधीक्षक अजित टिके यांच्यासह पोलिस फौजफाटा दाखल झाला होता.

दोन रुग्णवाहिका बंद अन्…

अपघातातील तीन जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी नागरिकांनी रुग्णवाहिकेला कळविले. त्यानुसार पहिली रुग्णवाहिका आली. मात्र, ती जखमींना घेतल्यानंतर घटनास्थळीच बंद पडली. त्यानंतर दुसरी रुग्णवाहिका बोलावली, तीही घटनास्थळी बंद पडली. अखेर तिसरी रुग्णवाहिका आली आणि त्यातून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील अंकली ते मिरजपर्यंतचा रस्ता वर्षापूर्वी वाहतुकीसाठी खुला केला आहे. परंतु, मिरज ते तानंग गावापर्यंतचा रस्ता अवघ्या दोन दिवसांपूर्वी वाहतुकीसाठी खुला केला आहे. याची माहिती प्रशासन आणि पोलिसांनादेखील नव्हती. रस्ता वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर अवघ्या तिसर्‍या दिवशी सहाजणांचा बळी गेला.

अपघात टळला असता…

राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असल्याने मिरज ते तानंग गावापर्यंत टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला नव्हता. मात्र, या महामार्गालगत राहणार्‍या नागरिकांकडून या रस्त्याचा वापर केला जात होता. रस्ता वाहतुकीसाठी खुला केल्याचे महामार्ग अधिकार्‍यांकडून प्रशासन आणि पोलिसांना कोणतीही माहिती दिली नव्हती. तसेच त्याचे फलकही कोठे लावले नव्हते. या परिसरातील नागरिकांनाही रस्ता सुरू केल्याची कल्पना दिलेली नव्हती. महामार्ग अधिकार्‍यांनी काळजी घेतली असती, तर हा अपघात टळला असता, अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती.

देवदर्शनाची इच्छा अपुरी

जयवंत पोवार हे मनमिळाऊ होते. त्यांनी सुट्टीत पंढरपूर देवदर्शनाचा बेत केला. आपले कुटुंब व इतर नातेवाईकांसह पंढरपूरला जाताना मिरज येथे सहाजणांचा अपघाताने दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांची देवदर्शनाची इच्छा अखेर अपुरीच राहिली.

ब्रेक लावलाच नाही!

सुमारे एक किलोमीटरवरचे वाहन दिसेल इतका रस्ता खुला होता. तरीदेखील समोरासमोर अपघात झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ट्रॅक्टर किंवा बोलेरो वाहनाने कुठेही ब्रेक लावल्याच्या खाणाखुणा रस्त्यावर दिसल्या नाहीत.

Back to top button