सातारा : लघुपाटबंधारेतील कर्मचार्‍याला मारहाण; युवतीसह कुटुंबीयांवर गुन्हा; लग्न करण्यासाठी तगादा | पुढारी

सातारा : लघुपाटबंधारेतील कर्मचार्‍याला मारहाण; युवतीसह कुटुंबीयांवर गुन्हा; लग्न करण्यासाठी तगादा

सातारा : पुढारी वृत्तसेवा : संगमनगर, ता. सातारा येथील लघुपाटबंधारे विभागातील कर्मचारी रवींद्र अशोक बोभाटे (वय 36, रा. मळुकवाडी, पो. तासगाव, ता. सातारा) यांना युवतीसह तिच्या कुटुंबीयांनी कार्यालयाच्या परिसरात मारहाण केली. या घटनेत कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, याप्रकरणी कर्मचार्‍याने सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून युवतीसोबत लग्न करीत नसल्याच्या कारणातून हा राडा झाल्याचे समोर आले आहे.

ही घटना दि. 13 मे रोजी सकाळी 11.30 वाजता पाटबंधारे विभाग येथे घडली आहे. रवींद्र बोभाटे यांनी दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, त्यांची संबंधित युवतीसोबत व तिच्या कुटुंबीयांसोबत ओळख आहे. घरकूल मंजुरीसाठी युवतीसह कुटुंबीय येत होते. त्यातूनच युवतीचा मोबाईल क्रमांक तक्रारदार यांना मिळाला व 2017 पासून ते एकमेकांच्या संपर्कात आले.

मोबाईलवरून युवतीसोबत त्यांचा संपर्क वारंवार होऊ लागला. त्यातून त्यांची चांगली ओळख होऊन ते मित्र बनले. युवतीने पैसे मागितल्यानंतर वेळोवेळी तिला 5, 10 हजार तसेच एकदा 1 लाख रुपये असे एकूण 4 लाख रुपये दिले. यातून संबंधित युवती तक्रारदार यांच्या प्रेमात पडली व तिने लग्न करण्याची मागणी केली. त्यावेळी तक्रारदाराने त्यांचे लग्न झाल्याचे सांगून लग्नाला नकार दिला. लग्नाला नकार ऐकताच संबंधित युवतीने तक्रारदार यांच्याकडे पैशांची मागणी केली. तसेच तिला लागतील तेव्हा पैसे द्यायचे, अन्यथा बलात्काराचा गुन्हा दाखल करेन, अशी धमकी दिली आणि वेळोवेळी पैसे घेतले. दि. 13 मे रोजी तक्रारदार बोभाटे कार्यालयाबाहेर थांबले असताना संबंधित युवती, तिची आई व भाऊ असे एकत्र आले. संबंधितांनी पुन्हा लग्न करण्याची मागणी करीत त्यांच्याशी हुज्जत घातली. यातूनच संशयितांनी लाथा-बुक्क्यांनी व काठीने तक्रारदार यांना मारहाण केली. या घटनेत तक्रारदार जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करुन पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी युवतीसह कुटुंबीयांविरुध्द मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.

पंचायत समितीमध्ये झाली ओळख

तक्रारदार यांच्या पत्नी पंचायत समितीच्या सदस्या आहेत. पत्नीसोबत त्यांचे पंचायत समितीमध्ये जाणे-येणे असायचे. यातूनच तक्रारदार यांची युवतीसह कुटुंबीयांची ओळख झाली. तसेच तक्रारदार बोभाटे यांचे एक नातेवाईक संबंधित कुटुंबीयांच्या गावात राहत असल्याने त्यांची ओळख आणखी घट्ट झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Back to top button