त्रिलोकी मराठी झेंडा!

स्वप्निल कुसाळे याच्या यशाने भारताची मान उंचावली
Swapnil Kusale's success made India proud
स्वप्निल कुसाळे याच्या यशाने भारताची मान उंचावलीPudhari File Photo
Published on
Updated on

पॅरिस ऑॅलिम्पिकमध्ये नेमबाजीत मनू भाकर, सरबज्योत सिंग यांच्या दोन कांस्यपदकांच्या झळझळीत यशानंतर याच खेळात देशासाठी तिसरे पदक कमावणार्‍या स्वप्निल कुसाळे याच्या यशाने भारताची मान उंचावली आहे. तब्बल 72 वर्षांनंतर या इतिहासाची पुनरावृत्ती व्हावी, तीही कोल्हापूरच्या मातीतील खेळाडूकडून, हे विशेष! 1952 च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये खाशाबा जाधव यांनी कुस्तीत पदक जिंकले होते. त्यानंतर स्वप्निलने हे देदीप्यमान यश मिळवले. तेजस्विनी सावंत, राही सरनोबत यांची पदकाची संधी थोडक्यात हुकली होती. ही कसर त्याने दमदार कामगिरी करत भरून काढली. नेमबाजीच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात कांस्यपदकाची कमाई करताना त्याने ही ऐतिहासिक कामगिरी केली. या प्रकारात ऑलिम्पिक पदक जिंकणारा तो पहिलाच भारतीयही ठरला, हे दुसरे विशेष! कारण, ऑलिम्पिकमध्ये 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात यापूर्वी भारताच्या एकाही नेमबाजाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचता आले नव्हते. कोल्हापूरच्या तांबड्या मातीत रांगडेपणा किती आणि कसा ठासून भरलेला आहे, हे त्याने पुन्हा एकदा दाखवून दिले. कलापूर नाव सार्थ करणारे अनेक कलावंत या मातीने घडवले, तसे खेळाचे क्षितिज व्यापणारे अनेक खेळगडीही याच मातीतून उगवले. कुस्ती म्हणजे कोल्हापूरच्या लोकांचा जीव की प्राण; पण अलीकडच्या काळात नेमबाजी या खेळाचे बीजही या मातीत चांगलेच रुजताना दिसते.

Swapnil Kusale's success made India proud
तरल प्रतिभेचा कणखर साहित्यिक

आंतरराष्ट्रीय पातळीवर कोल्हापूरचे नाव पोहोचवणार्‍या तेजस्विनी सावंत, राही सरनोबतपासून प्रेरणा घेत कोल्हापुरात नव्या दमाचे नवनवीन नेमबाज तयार होत आहेत. याच परंपरेतील स्वप्निल कुसाळे या पठ्ठ्याने थेट ऑलिम्पिकला धडक दिली आणि अचूक लक्ष्यवेध साधला. त्याचा इथपर्यंतचा प्रवास फारसा सोपा नव्हता. देशाच्या ग्रामीण आणि खेळासाठीच्या कोणत्याच सोयी-सुविधा नसणार्‍या भागातून येणार्‍या प्रत्येक खेळाडूची गोष्ट असते तीच त्याचीही पार्श्वभूमी आहे. तो कोल्हापूर जिल्ह्यातील कांबळवाडी या गावचा आहे. घरची खेळाची कोणतीच पार्श्वभूमी नसताना जागतिक पातळीवरील यशाला त्याने गवसणी घातली. शालेय वयातच खेळातच भविष्य घडवण्याचे ध्येय तो बाळगतो आणि अवघ्या 29 व्या वयातच तो ते साध्य करतो, हा केवळ आणि केवळ अचाट ध्येयासक्तीचाच करिश्मा! त्याला सायकलिंग करायचे होते; परंतु आंतरराष्ट्रीय नेमबाज नवनाथ फडतारे यांच्या सल्ल्याने तो नेमबाजीकडे वळला. रायफल शूटिंग निवडले. नवीन नेमबाजांचा ओढा पिस्तूल शूटिंगकडे असतो. हातात 0.2 चे पिस्तूल घेऊन उभे राहून शूट करण्यात त्यांना वेगळे साहस वाटत असते; पण थ्री पोझिशन रायफलमध्ये कपड्यांवर वजनदार लेदर जॅकेट पेलत मोठ्या आत्मविश्वासाने तो उभा राहिला.

Swapnil Kusale's success made India proud
अनिर्बंध ‘विकासा’चे पूरक्षेत्र !

गुरुवारी झालेल्या स्पर्धेत याचे प्रत्यंतर आलेही. पॅरिसमधील कडक उन्हाळ्याने तापलेल्या वातावरणाचा परिमाण शूटिंग रेंजवरही दिसत होता. त्याच्याबरोबर शूटिंग करणार्‍या आठ जणांपैकी सुवर्णपदक विजेता लिऊ युकुन वगळता बाकी सहाजण युरोपीयन देशांतील होते. उष्णतेमुळे त्यांना प्रचंड घाम येत होता. लेदर जॅकेटमुळे त्यात जास्तच भर पडत होती. नेमबाजी करताना खेळाडू रायफलच्या दस्तान्यावरील हँडलला गाल भिडवून नेम धरतात. अशावेळी डोक्यातून येणारा घामाचा ओघळ त्या खेळाडूंना एकाग्र होताना त्रास देत असल्याचे दिसत होते; पण लहाणपणापासून तांबड्या मातीत आणि सह्याद्रीच्या दर्‍या-खोर्‍यात, उन्हा-तान्हात, वारे-वावटळात वावरणार्‍या, अपार कष्ट आणि श्रमाचा घाम गाळणार्‍या स्वप्निलने हे आव्हान लीलया पेलले. शांतपणे, एकाग्र चित्ताने स्थितप्रज्ञ होऊन त्याने वेध घेतला. सुरुवातीला सहाव्या स्थानावर असलेल्या स्वप्निलने हळूहळू एकेक स्थान काबीज केले. नेमबाजीत ऑलिम्पिकमध्ये 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात अंतिम फेरी गाठणे हेच त्याच्यासाठी मोठे यश होते. आठ नेमबाजांच्या स्पर्धेत त्याच्यासमोर चीनचा विश्वविक्रमवीर लिऊ युकुन आणि जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेला झेक प्रजासत्ताकचा जिरी प्रिवरातस्की आदींचे आव्हान होते. रायफल थ्री पोझिशनमध्ये तीन प्रकारे नेमबाजी करावी लागते. पहिल्या प्रकारात एक गुडघा टेकून, त्यानंतर प्रोन पद्धतीत जमिनीवर झोपून आणि तिसर्‍या टप्प्यात उभे राहून लक्ष्य भेदावे लागते. पहिल्याच फेरीत त्याने कमी म्हणजे 9.6 गुणांनी सुरुवात केली. या दडपणाखाली मात्र कमालीच्या संयमाने एकेका फेरीचा वेध घेतला. तिसर्‍या स्थानासाठी स्वप्निल आणि जिरी यांच्यात स्पर्धा सुरू होती. एलिमिनेशनमध्ये तुलनेत जिरीने जास्त चुका केल्या आणि स्वप्निलनेे कांस्यपदकावर तसेच देशाचे नाव कोरले. युक्रेनचा सेरी कुलिश रौप्यपदकाचा मानकरी, तर चीनच्या नेमबाजाने सुवर्णपदक पटकावले.

Swapnil Kusale's success made India proud
राजकारणाचा ‘अग्निपथ’

या उमद्या खेळाडूच्या स्वप्नांना कशाचाच मर्यादा नसाव्यात, त्याच्या जिद्दीपुढे, अमर्याद महत्त्वाकांक्षेपुढे आकाशही ठेंगणे पडले. ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवायचे, हे नववीत असतानाच त्याने ठरवले होते. त्यासाठी लागणारी मेहनत, जिद्द आणि चिकाटी याचे उच्च कोटीचे प्रदर्शन त्याने घडवले. त्याचे फळ त्याला मिळाले. गेली अनेक वर्षे तो याच ध्येयाने प्रेरित होऊन घरापासून लांब होता. घरातील सण, समारंभ, सोयरसूतक यात त्याला सहभागी होता आले नव्हते. ज्या ध्येयासाठी त्याने हे सगळे सोसले त्यामागील अचाट ध्येयासक्तीचे कौतुक करावे तितके थोडेच. भारतासाठी यंदाच्या ऑलिम्पिकमधील पहिली तिन्ही पदके नेमबाजीतून आली आहेत. देशाने ऑलिम्पिकसाठी 117 जणांचे पथक पाठवले आहे. इतर खेळांतील पदकाचे प्रबळ दावेदार असलेले निखत झरिन (बॉक्सिंग), पी. व्ही. सिंधू, एच. एस. प्रणॉय, चिराग आणि सात्विक जोडी (बॅडमिंटन) आदी स्टार खेळाडू स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. या पार्श्वभूमीवर कोणताही डामडौल न बाळगणार्‍या स्वप्निलचे यश लख्ख उठून दिसते. ऑलिम्पिकचे स्वप्न बाळगणार्‍या प्रत्येक नवोदित खेळाडूला त्याने प्रेरणा मिळेल. मराठी मुलखाची क्रीडा संस्कृती बहरायला लागेल, तो दिवस दूर नाही, हेच स्वप्निलने सिद्ध करून दाखवले. क्रीडा क्षेत्राची सातत्याने होणारी उपेक्षा किमान आतातरी थांबेल, ही अपेक्षा! बहात्तर वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये मराठीचा झेंडा रोवायला कोल्हापूरची मातीच कारणी आली. महाराष्ट्राच्या या मातीतून अशीच नररत्ने जन्माला यावीत, ज्यांचा त्रिलोकी झेंडा लागावा!

Swapnil Kusale's success made India proud
ममतांची अजब ‘नीती’!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news