तरल प्रतिभेचा कणखर साहित्यिक

तमाम मराठी सारस्वतात एक मोठी पोकळी सोडून गेलेले फादर फ्रान्सिस दिब्रिटो
Father Francis Dibrito
फादर फ्रान्सिस दिब्रिटोPudhari File Photo
अनुपमा गुंडे

ज्येष्ठ साहित्यिक, पर्यावरणवादी विचारांचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, हरित वसई संरक्षण समितीचे संस्थापक तथा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष फा. फ्रान्सिस दिब्रिटो यांचे गुरुवारी प्रदीर्घ आजाराने वयाच्या 81 व्या वर्षी निधन झाले. केवळ वसईच नव्हे, तर राज्य आणि तमाम मराठी सारस्वतात एक मोठी पोकळी सोडून गेलेले फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे ख्रिस्ती धर्मगुरू कमी आणि निसर्ग, सृष्टी तथा मानवतेचा ध्यास घेतलेले सर्वधर्मीयांचे पिता शोभावेत, असे व्यक्तिमत्त्व होते.

ख्रिस्ती आध्यात्मिक धर्मगुरू, प्रतिभावान साहित्यिक, पर्यावरणासाठी लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते आणि मराठी- ख्रिस्ती साहित्यातील दुवा असलेले साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचा वसईतील नंदाखाल ग्रामातील चेलारी या गावात शेतकरी कुटुंबात 8 डिसेंबर 1943 रोजी जन्म झाला. येशू खिस्तांचा आदर्श, फादर बर्नर भंडारी यांच्यापासून मिळालेली प्रेरणा आणि साहित्यातून झालेल्या नश्वरतावादाच्या संस्कारातून त्यांनी धर्मगुरू होण्याचा निर्णय घेतला. गोरेगावच्या संत पायस महाविद्यालयातून त्यांनी धर्मगुरुपदाचा 10 वर्षांच्या अभ्यासक्रम पूर्ण केला. 1972 मध्ये त्यांंनी धर्मगुरू म्हणून दीक्षा घेतली; मात्र साहित्य आणि शिक्षणाप्रतीची त्यांची आस्था कधी कमी झाली नाही. बी.ए. समाजशास्त्र, साहित्य आचार्य, धर्मशास्त्रात एम.ए. या पदव्या त्यांनी प्राप्त केल्या होत्या. ख्रिस्ती धर्माचा धर्मग्रंथ असलेले बायबलचे मराठीतील भाषांतर हे बोजड होते. बायबलचे सोप्या, सहज, सर्वांना समजेल अशा मराठीत भाषांतर करण्याचे इंद्रधनू त्यांनी उचलले. एक तप त्यांनी या भाषांतरावर काम केले. त्यातूनच सुबोध बायबल आज केवळ ख्रिस्तीच नाही, तर मराठी कुटुंबांच्या घराघरांत पोहोचलेला हा ग्रंथ आज मार्गदर्शक स्वरूपात पुढे येत आहे.

ते रूढ अर्थाने ख्रिस्ती धर्मगुरू असले तरी त्यांनी सर्वधर्मसमभावाचा पुरस्कार करणारे लेखन केले. आपल्या लेखन, वाणी आणि कृतीतून आयुष्यभर त्यांनी साहित्याशी आपले स्नेहबंध बांधून घेतले. त्यांचा संत साहित्याचा अभ्यास गाढा होता. संत साहित्याचा प्रभावही त्यांच्या लेखनावर कायम दिसून येतो. धर्म आणि साहित्यात समाजप्रबोधनाची सकारात्मक शक्ती आहे, यावर त्यांचा द़ृढविश्वास होता. याच सकारात्मक शक्तीचा पुरस्कार त्यांनी धर्म आणि साहित्यातून केला. ख्रिस्ती समाजाचे मुखपत्र असलेल्या ‘सुवार्ता’ या नियतकालिकाची धुरा त्यांनी दोन तपांहून अधिक काळ सांभाळली. हे केवळ समाजाचे मुखपत्र न ठेवता या नियतकालिकाला फादर दिब्रिटो यांनी सामाजिक, वैचारिक व धार्मिक सुसंवादाचे व्यासपीठ केले. धार्मिक सुसंवाद वाढविण्यासाठी त्यांनी सर्वधर्मीय सोहळे साजरे करण्याची प्रथा सुरू केली. त्यांच्या या साहित्याच्या सकस प्रवासामुळेच 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. सृजनशील साहित्यामुळे त्यांनी लेखक म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली.

फादर दिब्रेटो यांनी ललित लेखनही केले. लेखनातून प्रतिबिंबित होणारी त्यांची तरलता, संवेदना प्रसंगी समाजात होणार्‍या अन्यायाच्या विरोधात उमटली. त्यांच्या याच स्वभावाचे दर्शन 90 ते 2000 च्या दशकात वसईकरांना घडले. वसईत समाजविघातक प्रवृत्तींकडून जमिनी विक्रीच्या व्यवहारातून निर्माण झालेल्या दहशतीला त्यांनी हरित वसई संरक्षण समितीच्या माध्यमातून चोख उत्तर दिले. पर्यावरणाची हानी करणार्‍या सिडकोच्या वसई विकास आराखड्याच्या विरोधात त्यांनी जनमानसात जागृती केली. त्याचा परिणाम वसईत चटई निर्देशांक मर्यादित केल्याने हरित वसईला संरक्षण मिळाले. वसईत अनधिकृत पाणी उपशाच्या विरोधातही त्यांनी पाणी बचाव महिला आंदोलन ही चळवळ सुरू केली. बागायती बचाव आंदोलन, एस.टी.चे खासगीकरण या विरोधात त्यांनी सनदशीर मार्गाने दिलेले लढे यशस्वी झाले.

साहित्य प्रांतातील मुशाफिरीसाठी आणि सामाजिक कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. ख्रिस्ती-मराठी साहित्य संमेलन, उस्मानाबाद येथे झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. अंत्यत संयत, संयमी आयुष्य जगलेले फादर दिब्रिटो यांनी प्रसंगी कणखर भूमिका घेतली. साहित्यातील लेखन व जगण्याची सांगड घालणे अनेकांना जमतेच असे नाही. तरल प्रतिभेचा एक साहित्यिक, अन्यायाविरोधात ताठ बाण्याने लढा देणारा सामाजिक कार्यकर्ता व सर्वधर्मीयांना जोडणारा एक धर्मगुरू, त्यांच्या जाण्याने आपल्या समाजातून गेला आहे... साहित्यिक आणि सामाजिक वर्तुळातही त्यांची आठवण कायमच राहील.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news