

दिल्लीतील मोर्चाच्या निमित्ताने ममता बॅनर्जी आणि सोनिया गांधी यांची एका व्यासपीठावर भेट झाली. राजकारणात व्यासपीठे बदलतात, भूमिका बदलतात; पण संधी मिळताच नेतृत्वाचे आशीर्वाद घेण्याची परंपरा कायम असते. आमच्या सूत्रांनी या दोघींमधील रंगलेला संवाद कानामागून आणून कानात सांगितला, तो असा...
ममतादीदी : मॅडम, किती दिवसांनी भेट झाली! तुम्हाला पाहून मन भरून आले.
सोनियाजी : अहो दीदी, हल्ली तब्येत बरी नसते. आणि राहुल आणि प्रियांका आहेतच जबाबदारी सांभाळायला. शिवाय मोर्चे, आंदोलने, निदर्शनांमुळे राजकारणापेक्षा रस्त्यावर उपस्थितीला महत्त्व आलेय.
ममतादीदी : अगदी बरोबर! आता ज्ञानेश कुमारांचंच घ्या. विरोधात एवढा मोठा मोर्चा काढला, तरी खुर्ची सोडायला तयार नाहीत. काहीजणांसाठी सरकारी खुर्च्या म्हणजे पूर्वजांची इस्टेटच असते...
सोनियाजी : राहुल तर रात्रंदिवस मेहनत घेतोय. पण दीदी, एक सांगू? तुमची भाषा हल्ली बरीच बदलली आहे!
ममतादीदी : (हात जोडत) होय मॅडम! तुम्हीच माझ्या नेत्या. आम्ही तुम्हाको भालो भासी! तुमच्यासाठी बंगाली, हिंदी, इंग्रजी सगळं चालेल. राजकारणात भाषेपेक्षा भावना महत्त्वाच्या!
सोनियाजी : पण दीदी, मल्लिकार्जुन खर्गे आमच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत.
ममतादीदी : त्यांचा विचार करू. पण सध्या तुमचाच विचार डोक्यात आहे. खर्गेजींचा आदर आहे; पण प्रेमाला पक्षाध्यक्षपदाची अट नसते!
सोनियाजी : बरं, पण ही जवळीक निवडणुकीतही कायम राहील ना... नाहीतर तेव्हा अनेकांना स्वतंत्र विचार सुचतात!
ममतादीदी : नाही मॅडम! आता तुम्ही पुढे, आम्ही मागे!
सोनियाजी : अहो, पण मागे किती?
ममतादीदी : ते परिस्थिती, जागावाटप आणि राहुलजींच्या रणनीतीवर ठरेल...
सोनियाजी : (हसत) म्हणजे प्रेम बिनशर्त आणि पाठिंबा मात्र अटींसह!
ममतादीदी : मॅडम, राजकारणात बिनशर्त फक्त घोषणा असतात. बाकी सगळ्याला अटी लागू!
सोनियाजी : (हसत) बरं, मग ठरलं... तुम्ही माझ्या मागे आणि राहुल माझ्या पुढे!
ममतादीदी : मॅडम, मी तुमच्यासोबतच आहे. तुम्ही फक्त हाक द्या!
सोनियाजी : उद्या नेतृत्वाचा प्रश्न आला तर?
ममतादीदी : (हसत) मॅडम, तेव्हा चर्चा करू...
सोनियाजी : म्हणजे पाठिंबा पक्का, पण पाठ फिरवण्याची सोयही खुली! याला म्हणायचं लवचिक नेतृत्व! (दोघी खळखळून हसतात)