

आपल्या दमदार राजकीय कारकीर्दीची किमान पंधरा वर्षे बाकी असतानाच अजित पवार यांचे अचानक निघून जाणे ही पवार कुटुंबाच्या दृष्टीने, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीने धक्कादायक आणि प्रचंड नुकसान करणारी घटना जरूर आहे, मात्र त्यापेक्षा नुकसान हे अखिल महाराष्ट्राच्या लोकशाहीचे झाले आहे. कोणत्याही लोकशाही व्यवस्थेत सत्तेवरील पक्षाला सकस, लोकहिताची दृष्टी बाळगून अन विधायक टीका करीत अंकुश ठेवणारा सक्षम विरोधी पक्ष तसेच त्याचे तेवढेच समर्थ नेतृत्व हवे असते.
अजित पवारांएवढी तर सोडाच, पण त्याच्या निम्मीही धमक असणारा एकही नेता सद्यस्थितीत कोणत्याही विरोधी पक्षांत नाही. परिणामी महाराष्ट्रातील लोकशाहीचा समतोल ढासळला आहे आणि अनिर्बंध कारभार न करता संयमाने राजशकट हाताळण्याची जबाबदारी सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर येऊन पडली आहे.
भले अजितदादा यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आतापर्यंत मुंबई विधिमंडळातील सत्तेत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाबरोबर मांडीला मांडी लावून बसला असेल, पण तरीही त्या पक्षाने आपले स्वतंत्र अस्तित्त्व कायम राखले आहे. एवढेच नव्हे तर नुकत्याच पार पडलेल्या महापालिकांच्या निवडणुकांत राष्ट्रवादीने भाजपशी दोन हात केले आणि येत्या आठ दिवसांत होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांचा पक्ष त्याच भाजपशी लढत देणार आहे. एवढेच नव्हे तर सत्ता भोगत असतानाही भाजपच्या अनेक धोरणांना उघड विरोध करण्याचा सडेतोडपणा अजितदादांनी दाखवल्याची अनेक उदाहरणे आहेत.
'बटेंगे तो कटेंगे' या निवडणूक युद्धज्वरातील घोषणेला सत्तेत असूनही विरोध करण्याचे धाडस त्यांनी दाखवले तसेच अनेकदा शिव-फुले-शाहू-आंबेडकरांचे तत्त्व आपण सोडले नसल्याचेही वक्तव्य त्यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या नेतृत्वामुळे मुंबई महापालिकेत राष्ट्रवादीची युती न करण्याची भूमिका भाजपने घेतल्यावर अजितदादांनी ठामपणाने स्वतंत्र लढण्याची भूमिका घेतली. लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची लाडकी योजना असली तरी त्यामुळे सरकारी तिजोरीला मोठे भोक पडत असल्याची जाहीर नाराजी अजितदादांनी व्यक्त केली. अशा एक ना दोन घटना अजितदादा आपले स्वतंत्र अस्तित्त्व राखण्याचा जोरदार प्रयत्न करीत होते, हे स्पष्ट करणाऱ्या होत्या. म्हणजेच सरकारमध्ये राहूनच त्यांना अयोग्य वाटणाऱ्या गोष्टींना ठामपणाने विरोध करण्याची त्यांची भूमिका ही विरोधी पक्षाचेच काम करणारी होती.
महापालिका निवडणुकीच्या प्रचारात 'अजितदादांशी संबंधित असलेली जलसंपदा विभागाच्या प्रकरणाची फाईल अजून मिटलेली नाही', असे वक्तव्य महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रचाराच्या ओघात केले, त्याला उत्तर देताना 'माझ्यावर आरोप होऊनही मी अजून त्यांच्याबरोबर सत्तेत आहे ना, ते आरोप खरे असते तर मी सत्तेत असतो का', अशा प्रतिप्रश्नांची सरबत्ती अजितदादांनी केली. 'मी राज्यात सत्तेत असलो तरी पिंपरी महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे आपण बाहेर काढणार आहोत', असे सुनावण्यास त्यांनी कमी केले नाही. त्यांच्या या कडक प्रचारामुळे सत्ताधारी भाजप अस्वस्थ झाला होता तरी त्याची अजित पवारांनी पर्वा केली नव्हती.
सत्तेत राहून आपले स्वतंत्र अस्तित्त्व अजितदादांनी राखले होतेच, पण भविष्यकाळात पुन्हा सर्व पातळ्यांवरील विरोधी पक्ष म्हणून समोर उभे ठाकण्याचा पर्यायही ते खुला ठेवून होते...., मात्र त्यांच्या जाण्याने सत्ताधारी पक्षावरील हा अंकुश नाहिसा झाला आहे. लोकशाहीच्या कोणत्याही पातळीवरच्या यंत्रणेत समर्थ विरोधी पक्षाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते. लोकहिताची दृष्टी ठेवून तसेच विधायक टीका करीत सरकारवर योग्य तो अंकुश ठेवणारा विरोधी पक्ष ही लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आवश्यक बाब असते. लोकशाहीचा समतोल योग्य, सक्षम विरोधी पक्षाने राखला जातो. अजितदादांच्या आकस्मिक निधनाने महाराष्ट्राच्या लोकशाहीतील हा समतोल ढासळला आहे. महाराष्ट्रातील सत्ताधारी भाजपला विरोध करणाऱ्या कोणत्याही पक्षात तूर्ततरी अजितदादांच्या तोलामोलाचा,
तेवढी धमक, राजकीय कर्तृत्व असणारा, वलयांकित, जनमानसावर पकड तसेच त्यांना आकर्षून घेणारा, कार्यक्षम, प्रशासनावर खंबीर मांड असणारा, जबरदस्त राजकीय इच्छाशक्ती बाळगणारा, जलद निर्णय घेऊन त्याची तेवढ्याच गतीने अंमलबजावणी करवून घेऊ शकणारा नेता दिसत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसकडे हे गुण असणारे एकच नेतृत्व आहे आणि ते आहे शरद पवार यांचे, मात्र त्यांच्या वाढत्या वयामुळे त्यांना ही जबाबदारी पेलणे आता शक्य नाही. काँग्रेसच्या ज्येष्ठ, अनुभवी नेत्यांतही कारभाराचा गाडा चालवण्याची ताकद आता उरलेली नाही.
धमक असलेले नेते थकले आणि नवनेतृत्वामध्ये तो नेतृत्वगुण नाही, या स्थितीत सकस विरोध करू शकणाऱ्या नेतृत्वाची पोकळी कधी नव्हे एवढी आता जाणवू लागली आहे. 'मोठ्या व्यक्तिमत्त्वाच्या जाण्याने पोकळी निर्माण झाली', असे आता गुळगुळीत झालेले वाक्य अजितदादांच्या बाबतीत विरोधी नेतृत्वाच्या मुद्द्यावर वास्तव ठरते.
... म्हणूनच, अजितदादांची अकाली एक्झिट ही पवार कुटुंबीय, बारामतीकर, त्यांचा पक्ष यांच्यापेक्षा अधिक राज्यातील लोकशाहीच्या दृष्टीने धक्कादायक मानली पाहिजे.