

वसई : महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर दोन दिवसांपूर्वीच दादांशी बोलणे झालेले. वसई विरारच्या विकासासाठी शासनाची मदत लागेल, असे सांगताच दादा म्हटलेले, शंभर टक्के करणार, या निवडणुकीत महाराष्ट्रभर राजकीय पक्षांची पीछेहाट झाली असताना, तुम्ही गड राखला, म्हणून दादांनी भरभरून दाद दिली. राजकारणापलीकडील दिलेर माणूस, शब्दाने परखड पण तितकेच प्रेमळ,
आपल्या राजकीय कारकीर्दीत प्रभाव सोडून गेलेल्या दोघा-तिघांपैकी एक प्रमुख नेता म्हणजे दादा होय! दादांच्या अकाली जाण्याने एक मोठा आधार आणि आपल्याच कुटुंबातील कुणीतरी गेल्याचं दुःख आपण अनुभवतोय, अशी प्रतिक्रिया बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष, तथा माजी आमदार हीतेंद्र ठाकूर यांनी उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना गदगदल्या स्वरात दिली.
सार्वजनिक क्षेत्रातील प्रश्न किंवा समस्या घेऊन आलेल्या कार्यकर्ते, नेत्यांची जात, पक्ष किंवा प्रांत न पहाता त्यांनी आणलेल्या कामास गुणवत्तेच्या आधारावर निराकारण करणारे, काम चौकटीत बसणारे आणि होणारे असेल तर हो सांगणारे, तसेच अशक्यप्राय असेल तर गोड गोड बोलून कुणाला खोटी आशा न लावता, स्पष्टपणे नाही म्हणणारे दादा होते. पोटात एक आणि ओठात वेगळे असे दादा कधीच कुणी अनुभवले नाहीत. संपूर्ण राज्याला हादरवून टाकणारी ही दुर्दैवी घटना असून, आणखी काही वर्षे महाराष्ट्राला दादा हवे होते, असेही ठाकूर म्हणाले.