

आज भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन! ब्रिटिशांच्या वसाहतवादातून आणि गुलामगिरीतून मुक्त होऊन स्वातंत्र्यसूर्य भारताच्या नभांगणात अवतरणे, ही जगाच्या इतिहासातील एक अलौकिक आणि परिवर्तनशील घटना म्हणून नोंदवली गेली. असंख्य क्रांतिकारकांनी, स्वातंत्र्यसैनिकांनी, विचारवंतांनी आणि स्वातंत्र्यप्रेमी नागरिकांनी यासाठी संघर्ष केला, प्राणांची आहुती दिली. प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत सलग आठ दशके विविधतेने नटलेल्या देशाला एकसंध ठेवत आणि विकासाचा मार्ग स्वीकारत भारताने लोकशाही अखंडित ठेवली. संविधानाने दिलेले अधिकार आणि स्वातंत्र्याची हमी हे कोणत्याही सुदृढ राष्ट्राचा पाया असतात, ज्यावर देशाची इमारत उभी असते. प्रसिद्ध ब्रिटिश इतिहासकार आर्नोल्ड टायन्बी म्हणतात की, संघर्ष आणि विनाशाच्या छायेत वावरणाऱ्या आजच्या जगाला टिकून राहायचे असेल, तर भारताच्या सहिष्णुतेचा आणि शांततेचा संदेश हा एकमेव मार्ग ठरू शकतो. अनेक भाषा, धर्म आणि संस्कृतींचे लोक शांततेने कसे नांदू शकतात, याचे भारत उत्तम उदाहरण आहे. स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या काही दशकांत भारतासमोर देश उभा करण्याचे आव्हान होते. शेतीप्रधान अर्थव्यवस्थेला औद्योगिक आधार देणे, सिंचन आणि वीजनिर्मिती वाढवणे, धरणे आणि कारखाने उभारणे, शिक्षणाच्या सुविधा वाढवणे आणि आरोग्यव्यवस्था उभी करणे, ही कामे टप्प्याटप्प्याने झाली. नियोजनाच्या मार्गाने देशाने विकासाचा पाया घातला.
अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी हरित क्रांतीने बळ दिले. त्यानंतर आर्थिक सुधारणांनी भारतीय अर्थव्यवस्थेला नवी दिशा दिली. खासगी उद्योग, परकीय गुंतवणूक, सेवा क्षेत्र आणि माहिती-तंत्रज्ञानाच्या विस्तारामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा चेहरामोहरा बदलला. गेल्या दशकाने या वाटचालीला गतिमानता देत महासत्तेच्या दिशेने प्रवास आरंभला. ज्या इंग्रजांनी भारताला साप-गारुड्यांचा देश म्हणून हिणवले होते आणि भारतीय लोकशाही, स्वातंत्र्य फार काळ टिकणार नाही अशा वल्गना केल्या होत्या, त्या ब्रिटनला मागे सारून भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला. जगातील सर्वाधिक विकास दर असणारा देश म्हणून भारताकडे जग औत्सुक्याने पाहत आहे. आकांक्षावादी विशाल बाजारपेठ, अन्नधान्योत्पादनातील स्वावलंबन, सर्वाधिक तरुण नवोन्मेषी लोकसंख्या, औद्योगिक प्रगती, तंत्रज्ञानातील सामर्थ्य, स्टार्टअप्समधील भरारी, अवकाश संशोधनातील देदीप्यमान यश, हवामान बदलाच्या क्षेत्रातील धवल कार्य, विदेशी गुंतवणूकदारांची पहिली पसंती यांसह शंभरीकडे निघालेल्या भारताची असंख्य बलस्थाने आहेत. दशकभरापूर्वीपर्यंत पश्चिमी प्रगत जगाच्या धोरणांचा अनुनय करणारा भारत आता जागतिक अजेंडा ठरवत आहे.
भारताला डावलून जागतिक अर्थकारणाचा, राजकारणाचा विचार करणे आता अशक्य बनले आहे. यंदाच्या स्वातंत्र्यदिनाला अनेक सोनेरी पैलू आहेत. स्वातंत्र्यदिनाचे सर्वांत प्रभावी प्रतीक म्हणजे भारताच्या राष्ट्रध्वज. संविधान सभेने २२ जुलै १९४७ रोजी आजच्या राष्ट्रध्वजाची रचना स्वीकारली. केशरी, पांढरा आणि हिरवा असे तीन रंग आणि मध्यभागी निळ्या रंगाचे अशोकचक्र अशी तिरंगा ध्वजाची रचना असून यातील प्रत्येक घटकाला प्रतीकात्मक अर्थ आहे. अशोकचक्र आपल्याला सतत गतिमानतेचे आणि परिवर्तनाचे महत्त्व सांगत 'थांबला तो संपला' असा संदेश देते. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून २०२२ पासून विद्यमान सरकारने 'हर घर तिरंगा' अभियान आरंभले. सरकारी कार्यालये आणि सार्वजनिक संस्थांपुरता मर्यादित राहिलेला ध्वज सामान्य नागरिकाच्या घरापर्यंत पोहोचणे ही या अभियानाची सकारात्मक बाजू आहे. राष्ट्रध्वज आपल्याला नेहमीच कर्तव्यकठोर राहण्याची प्रेरणा देतो. डौलाने फडकणाऱ्या भारतीय राष्ट्रध्वजाकडे आपण अभिमानाने पाहतो तेव्हा नकळत स्वातंत्र्यलढ्याचा संघर्षशील आणि प्रेरणादायी इतिहास आपल्या डोळ्यांसमोरून पुढे सरकत असतो.
सर्व भारतीयांना सन्मानाची हमी आणि विकासाची संधी बहाल करणारे भारतीय संविधान आणि राष्ट्रध्वज हे दोन्ही आपल्यासाठी अभिमानाचे विषय आहेत. राष्ट्रध्वजाला सलामी म्हणजे भारताच्या बहुविध संस्कृतीचा सन्मान. जगाच्या विविध भागांत राहणाऱ्या भारतीयांच्या मनातही राष्ट्रध्वजाविषयीचे स्थान तितकेच जिव्हाळ्याचे आहे. ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त यंदा प्रथमच ’सूर्यपथ तिरंगा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. फिजीपासून अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोपर्यंत असलेल्या ५४ भारतीय दूतावासांमधून तिरंग्याच्या छायाचित्रांचे पूर्वेकडून पश्चिमेकडे डिजिटल पद्धतीने प्रेषण केले जाणार आहे. वेगवेगळ्या टाईमझोनमुळे या उपक्रमाला एक आगळी प्रतीकात्मकता प्राप्त झाली आहे. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तयार होणारी ही साखळी जगभर विखुरलेल्या भारताच्या राजनैतिक उपस्थितीला एका राष्ट्रीय प्रतीकाशी जोडण्याचा प्रयत्न आहे. अलीकडे राष्ट्राच्या सन्मानाशी संबंधित कायद्यात करण्यात आलेल्या बदलामुळे 'वंदे मातरम्'लाही राष्ट्रगीताप्रमाणे कायदेशीर संरक्षण देण्यात आले आहे. याचा पुढील टप्पा म्हणजे ८० वर्षांत प्रथमच यंदा लाल किल्ल्यावर 'वंदे मातरम्' गायले जाणार आहे.
बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या लेखणीतून साकारलेले हे गीत स्वातंत्र्यलढ्याच्या काळात राष्ट्रभावनेचे प्रभावी प्रतीक बनले. या प्रतीकाला राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या मुख्य सोहळ्याशी जोडण्याचा प्रयत्न स्पृहणीय आहे; पण राष्ट्रध्वजाला सलामी किंवा राष्ट्रीय सणांच्या दिवशी देशभक्तीपर गीतांचे गायन इतका राष्ट्रभक्तीचा संकुचित अर्थ नाही. स्वातंत्र्याचा, संविधानाचा आणि सामूहिक हिताचा आदर करून त्यासाठी आपली जबाबदारी पार पाडणे म्हणजे राष्ट्रप्रेम. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात हीच भावना लाखो सामान्य माणसांना एकत्र घेऊन आली. महात्मा गांधींपासून भगतसिंगांपर्यंत आणि सरदार पटेलांपासून नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यापर्यंत सर्वांनी राष्ट्र प्रथम ही भूमिका ठेवून सारे आयुष्य समर्पित केले. त्यागाची ही भावना नसती, तर केवळ राजकीय रणनीतीच्या बळावर ब्रिटिश सत्तेविरुद्ध इतका व्यापक संघर्ष उभाच राहिला नसता. राष्ट्ररक्षण ही केवळ सैन्याची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. देशाच्या प्रगतीत आपला वाटा उचलणे हेच या भावनेचे दैनंदिन रूप आहे. घरावर फडकणाऱ्या राष्ट्रध्वजाने दाखविलेल्या एकतेची, त्यागाची आणि प्रगतीची भावना आपल्या कृतीत उतरविणे हाच स्वातंत्र्यदिनाचा सार्थ संकल्प होय. या संकल्पानुरूप प्रत्येकाचे आचरण हाच विकसित राष्ट्राचा आधार ठरणार आहे. स्वातंत्र्यसैनिकांनी पाहिलेले सोनेरी स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. तिचे काटेकोर पालन करणे, हेच स्वातंत्र्यसूर्याला खरे अभिवादन ठरेल.