Ashadhi Wari 2025: वारीचं ना आमंत्रणाचं औपचारिक कार्ड, ना जेंटल रिमाईंडर... मग ही आस, ही ओढ नेमकी येते कुठून?

Ashadhi Wari and Warkari tradition in Maharashtra: भागवत धर्माचे विशाल दर्शन वारीमध्ये घडते. समाजातील दीन-दलितांना, कष्टकऱ्यांना सामावून घेण्याची ताकद
Ashadhi Wari 2025
Ashadhi Wari 2025Pudhari
Published on
Updated on

Ashadhi Wari and Warkari tradition in Maharashtra

सुनील माळी

ना आमंत्रणाचं औपचारिक कार्ड, ना जेंटल रिमाईंडरचा व्हॉट्स अप मेसेज, ना पेपरमध्ये मोठमोठाल्या जाहिराती, ना कुणा नेत्याची प्रेस कॉन्फरन्स..., पण कँलेंडरमध्ये ज्येष्ठाचा महिना येतो अन पहिला पंधरवडा सरल्यावर लाखो पावलं आळंदीमध्ये मांडी घालून गेली सव्वासातशे वर्षे आत्मारामाशी रत झालेल्या ज्ञानदेवांकडं तसंच देहूला विठ्ठलकल्लोळात बुडून गेलेल्या तुकोब्बारायाकडं आपोआप वळतात, हरिमुखे म्हणत सावळ्या विठ्ठलाच्या भेटीच्या ओढीनं भूलोकीच्या वैकुंठीकडं पडत राहतात... जगाच्या पाठीवर शिकवल्या जाणाऱ्या मोठमोठ्या मँनेजमेंटच्या कोर्सेसमध्ये भरती न होताही बहुसंख्य अशिक्षित-अल्पशिक्षितांचा प्रामुख्यानं समावेश असलेला हा जनांचा प्रवाहो काटेकोर शिस्तीनं पण एकमेकांशी तेवढ्याच प्रेमानं-आस्थेनं वागत वाहात राहतो, भागवत पताका फडकावत सात्विकतेनं-भक्तीनं वातावरण भारून टाकतो... प्रश्न पडतो ही ओढ नेमकी येते कुठून...?

अथांग-अनंत विश्वस्वरूप असलेल्या परमात्म्याचा आपल्या नश्वर शरीरात असलेल्या आत्म्याशी संयोग व्हावा, जिवाचं शिवाशी, पिंडाचं ब्रह्मांडाशी मिलन व्हावं यासाठी पृथ्वीतलावरच्या साधकांनी पूर्वापार प्रयत्न केले, तो योग जुळून आलेल्या दार्शनिकांनी स्वत:ची सूत्रं बनवली. विविध धर्मांच्या नावांनी त्या सूत्रांचा अवलंब करण्यात येऊ लागला.

Ashadhi Wari 2025
Wari 2025: पंढरीचा पांडुरंग 28 युगांपासून योगमुद्रेत; मूर्ती अभ्यासकांनी उलगडले मूर्तीच्या योगमुद्रेचे गुपित

जगातल्या सर्व तत्त्वज्ञानांमध्ये सर्वश्रेष्ठ असलेल्या भारतीय तत्त्वज्ञानानं अद्वैताबरोबरच द्वैताचाही पुरस्कार करताना परमात्म्याला विविध रूपांमध्ये साकारलं. भक्तिमार्गानं नामस्मरण करत भवसागर तरून जाण्यासाठी सुरूवातीच्या काळात साकारलेल्या सगुण दैवतांची उपासना पद्धती हळूहळू क्लिष्टतेकडं जाऊ लागली. बहुजन जनसामान्यांपासून ती दूर होऊ लागली. लिखित साहित्यात म्हणजे संस्कृतातल्या विविध ग्रंथांमध्ये आध्यात्मिक ज्ञान कोंडले गेले आणि केवळ वाचता येणाऱ्या ब्राह्मणादी वर्गापुरते ते मर्यादित राहू लागले.

देववाणी म्हणून गौरवलेली वेदवाणी म्हणण्याचा अधिकार समाजातल्या इतर घटकांना नाकारला गेला अन ते म्हणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना भयानक शिक्षा देणारी तत्कालिन  एकतर्फी कायद्याची पुस्तकंही पुढं आली. दैवतांच्या संकल्पनांभोवती या अभिजन-वरिष्ठ मानल्या गेलेल्या वर्गाचाच वेढा पडला तेव्हा अशिक्षित-अल्पशिक्षित आणि बव्हंशी शेती करणाऱ्या बहुजन वर्गानं पारमार्थिक कल्याणाबरोबरच ऐहिक उन्नतीसाठीही कोणत्या धर्माचा आधार घ्यायचा ?

जगात सर्वश्रेष्ठ असलेल्या भारतीय तत्त्वज्ञानात कर्मकांडाचे स्तोम माजू लागले. यज्ञयागाला प्राधान्य देणाऱ्या, बकऱ्यांपासून घोड्यांपर्यंतच्या प्राण्यांची आहुती देणाऱ्या आणि केवळ विशिष्ट मंडळींनाच आचरणात आणता येणे शक्य असलेल्या वैदिक संस्कृतीला इसवीसनापूर्वीच्या काही शतकांत बौद्ध आणि जैनधर्माने पर्याय देण्याचा प्रयत्न केला.

अहिंसेचे तत्त्व, सोपी आचरणपद्धती आणि सर्वांनामुक्त प्रवेश यांमुळे प्रारंभीच्या काळात या बौद्ध-जैन धर्माकडे बहुजनओढले गेले. त्यानंतर पुढे पुन्हा वैदिक धर्माचे पुनरूज्जीवन झाले, पणखऱ्या अर्थाने धार्मिक-सामाजिक-सांस्कृतिक क्रांती केली ती भागवतधर्माने. महाराष्ट्रातील क्रांतिकारकांचा धर्म असाच भागवत धर्माचा उल्लेखकरावा लागेल. बौद्ध-जैनांमधील अहिंसा, शाकाहार, दयाक्षमाशांतीच्यातत्त्वज्ञानाला, सोप्या आचरणपद्धतीला एका बाजूने उजाळा देत दुसरीकडेवैदिकांनी स्वीकारलेल्या वैष्णव पंथाचा अवलंबही भागवत धर्मीयांनी केला.

तेराव्या शतकानंतर खऱ्या अर्थानं पारमार्थिक वाट दाखवली ती भागवत-वारकरी धर्मानं. सर्वांशी भावनिक बंध असलेल्या, सर्वांना सखा वाटणाऱ्या विठ्ठलाच्या उपासनेकडे हा बहुजन वर्ग ओढला गेला. आतापर्यंतच्या दैवतकल्पना या शस्त्रे हाती घेतलेल्या, युद्धे करणाऱ्या, बहुभुजाधारी अशा होत्या. या अनेको दैवतांपेक्षा वेगळी विठ्ठलमूर्ती वारकरी संप्रदायात आहे. हाती शस्त्र नाहीच, पण ते हात कंबरेवर ठेवलेली शांत, सात्त्विक, अहिंसेचे महत्त्व अधोरेखित करणारी अशी सर्वांगसुंदर मूर्ती पंढरपूरच्या विठ्ठलाची आहे.

कर्मकांडाला येत गेलेले अनाठायी महत्त्व वारकरी-भागवत धर्माने कमी केले. मांसाहार वर्ज्य करावा, मद्यपान करू नये, गळ्यात तुळशी माळ घालावी, कपाळी टिळा लावावा, एकादशीला उपवास करावा आणि सर्वांचे कल्याण व्हावे अशी 'सर्वे भवन्तु सुखिन: सर्वे संतु निरामया' वृत्ती बाळगावी एवढीच ढोबळ आचारसंहिता या धर्माने आखली. ती सर्वसामान्यांना आपले व्यवहार सांभाळत पार पाडणे सहजशक्य होते. भागवत धर्माची वेशभूषाही विशिष्ट रंगांच्या कपड्यांशी संबंधित नव्हती.

संतांच्या रचनांच्या पुस्तकांपेक्षा ते पाठकरण्यावर म्हणजेच मौखिक परंपरेवर भर देण्यात आला. त्यामुळेच अशिक्षितवारकरीही शेकडो अभंग म्हणतात.मराठमंडळातील गरीब तसेच शोषित वर्गाशी, अविकसित अर्थव्यवस्थेशी ती निगडितहोती. त्यामुळे खर्चिक यात्रांना फाटा देऊन वारीचा अवलंब करण्यात आला आणितोही पायी वारीचा. चातुर्वण्याच्या कालबाह्य रूढीपेक्षा समता, बंधुता हीतत्त्वे पुरोगामी, कालसुसंगत ठरली. इस्लामी धर्मप्रसाराचा रेटाही याभागवत धर्माने मागे हटविला तसेच सनातनी ब्राह्मण्यालाही प्रभावहीन केले.

त्यामुळेच कष्टकरी, तत्कालिन मागास मानल्या गेलेल्या जातींमधूनही गोरा कुंभार, नामदेव, चोखा मेळा, बंका महार, नरहरी सोनार, संत जनाबाई, विसोबा खेचर, सावता माळी आदी अनेको संत पुढे आले. वेदांची महती आपल्यालाच माहिती असल्याच्या दर्पौक्तीला तुकारामांनी 'वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा, येरांनी वाहावा भार माथा' असे खणखणीत उत्तर दिले.

Ashadhi Wari 2025
Wari 2025| अक्षर वारी भाग 9: पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती

भागवत धर्माने वैदिक-हिंदू धर्मापेक्षा साधी-सोपी आचारसंहिता अवलंबली तरी त्या देशभर रूजलेल्या तत्त्वज्ञानाशी फटकून वागण्याची वृत्ती मात्र ठेवली नाही. उलट त्याने त्यातील अनेक भाग आपलेसे केले. त्याने महाकाव्ये, पुराणे, धर्मग्रंथ, महापुरूषांची चरित्रे आदी आधी वैदिक आणि आठव्या-नवव्या शतकापासून ज्याचा उल्लेख हिंदू म्हणून करण्यात येऊ लागला, अशा धर्मातील भागांचा सढळ हाताने वापर केला. त्यांच्यातील मूळ सहिष्णु वृत्तीमुळेच हे शक्य झाले. परिणामी विशाल अशा हिंदू धर्माशी संलग्न असाच भागवत धर्म झाला. विशेषत: कीर्तन या वारकरी संप्रदायातील प्रकारामध्ये त्याचा विशेष प्रत्यय येतो. आपले दिवसभराचे काम झाल्यावर गावातील मंदिरात किंवा पटांगणात कष्टकरी वर्ग कीर्तनात रमून गेलेला दिसून येतो. रंजनाबरोबरच धार्मिकता जपण्याची, एकमेकांत मिसळण्याची संधी त्यांना मिळते.

...अशा या भागवत धर्माचे विशाल दर्शन वारीमध्ये घडते. समाजातील दीन-दलितांना, कष्टकऱ्यांना सामावून घेण्याची ताकद त्यातून दिसून येते. वारी हा अनुभवण्याचा सोहळा आहे. वारी हे महाराष्ट्राच्या व्यापक समाजजीवनाचे जितेजागते दर्शन आहे. वारी हे महाराष्ट्रदे‌शाच्या एकात्मतेचे सुंदर प्रतिक आहे. वरकरणी विविध जातीजमातींत विभागल्या गेलेल्या समाजपुरूषाचे एकात्म मन वारीतून प्रकट होते. 'जो जे वांछिल ते तो लाहो' म्हणणाऱ्या ज्ञानदेवांपासून 'नाचू कीर्तनाचे रंगी' म्हणणाऱ्या नामदेवांपर्यंतच्या सर्वांमधून भागवत धर्माची सहिष्णुता, करूणा, भक्ती, प्रेम वारीतून प्रकर्षाने जाणवते. 'विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा' म्हणत, जातीपातींचे बंधन दूर करत अन एकमेकांच्या पाया पडत लाखो महाराष्ट्रजन जेव्हा देहभान विसरून वाळवंटी नाचू लागतात तेव्हा परब्रह्माचे दर्शन घडते. आषाढी एकादशीच्या दिवशी सारा महाराष्ट्र तनाने नसला तरी मनाने भूलोकीच्या वैकुंठीमध्ये म्हणजे पंढरपुरात असतो.

Ashadhi Wari 2025
Ashadhi Wari 2025: पंढरीच्या खजिन्यात आहे तरी काय? पाचव्या शतकापासून राजे, संस्थानिकांनी अपर्ण केलेली अनमोल रत्ने वाचा

आषाढी एकादशीला पंढरपुराला पोचायची आस घेऊन काही लाख वारकरी आळंदी-देहूला पोचतात. तिथून पंढरपूरकडे ज्ञानोबा-तुकोब्बांच्या पालख्या वाट चालत असताना मोठ्या नदीला जसे ओढे येऊन मिळतात तसे गावोगावचे भागवतधर्मी त्यांच्यात सहभागी होतात आणि शेवटी पंढरपुरात ही नदी विशाल सागराचे रूप घेते. वारीचा हा प्रवास जसा रोमांचक अनुभव देतो, तसाच अनेक थक्क करणाऱ्या गोष्टीही शिकवतो. शाळेतील एखाद्या वर्गातील पन्नास मुलांना मैदानावर रांगेनं उभं करायचं म्हटलं तर दोन-तीन शिक्षकांना घसाफोड करावी लागते.

गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीसारख्या कार्यक्रमाच्या व्यवस्थापनासाठी पोलिसांचा मोठा ताफा लागतो, पण वारीमध्ये वाहतूक आणि गावोगावच्या भाविकांच्या दर्शनाच्या व्यवस्थेसाठी लागणाऱ्या पोलिस बळाखेरीज वारीच्या व्यवस्थापनाचे काम त्यांना अभावानेच करावे लागते. मँनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी खूप काही शिकावे असे वारीत बरेच काही असते. पहाट झाली की एका इशाऱ्यासरशी गावभर विखुरलेले वारकरी आपापल्या दिंडीची जागा घेतात.

काहींच्या हाती टाळ असतात, काहींच्या डोई तुळशीवृंदावन असते तर काहींच्या डोई विठ्ठलाची छोटीशी मूर्ती. विणेकऱ्याची वीणा झंकारत असते. विठ्ठल नामाचा गजर करत, अभंग म्हणत एका लयीत हा मेळा पुढे चालू लागतो. प्रत्येक दिंडीतील वारकऱ्यांची नोंदणी दिंडीप्रमुखाकडून होते. या दिंडीच्या ट्रकमध्ये वारकऱ्यांचे कपडे आणि अन्य सामान असते. दिंडी चालू लागायच्या आधीच तो ट्रक पुढच्या मुक्कामाला रवाना होतो. पुढचा मुक्काम गाठला की आचारी स्वयंपाक करून तयार राहतात. गावोगावचे भाविक वारकऱ्यांच्या भोजनाची, फळेवाटपाची व्यवस्था करीत असले तरी दिंडीतील वारकऱ्यांचे सुग्रास जेवण त्यांच्या दिंडीच्या मुक्कामाच्या ठिकाणी तयार असते.

अनेक दिंड्यांबरोबर पाण्याचे छोटे टँकरही असल्याचे दिसून येते. काही मुक्कामांतील जेवणाचा मेनूही आधीच ठरलेला असतो. कुठंही रांग मोडणं नाही, दिंडीकऱ्यांची चेंगराचेंगरी नाही. ही शिस्त नेमकी येते कुठून ?

वर्षभर आपापल्या कामात व्यग्र असलेल्या वारकऱ्यांना ज्येष्ठात आस लागते ती वारीची. पडणाऱ्या पावसाची तमा ते बाळगत नाहीत, दिवसभर चालण्याचे-प्रसंगी चिंब भिजण्याचे कष्ट त्यांना जाणवत नाहीत. त्यांच्या

चेहऱ्यावर वैताग नव्हे तर प्रसन्नभाव असतो. ते वेगळ्याच विश्वात असतात, वेगळ्याच आनंदात असतात. दिवसभर चालूनही मुक्कामाच्या रात्री वेगवेगळ्या मंदिरांमधल्या, मैदानावरल्या भजन-कीर्तनात ते रमून जातात. पंढरपूरच्या आधीचा मुक्काम असतो वाखरीचा. वाखरीहून निघालेले वारकरी जवळपास धावतच विठुरायाच्या नगरीत आतुरतेने प्रवेशतात आणि आजच्या एकादशीच्या दिवशी चंद्रभागेच्या वाळवंटी संत गोळा होत हरिकीर्तनात रंगून जातात.

आजच्या जगात बरेच जण आपल्या उपक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स किंवा गिनीज बुकमध्ये व्हावी, यांसाठी प्रयत्न करताना दिसतात, परंतु ही आषाढवारीमध्ये सहभागी होणारे वारकरी अशा विक्रमासाठी सहभागी होत नाहीत तर मनाने, स्वखुशीने पांडुरंगाच्या, संत तुकाराम-ज्ञानदेवांच्या प्रती असलेल्या भावपूर्ण भक्तीने सहभागी होतात. अशिक्षितांपासून ते उच्च शिक्षितांपर्यंतचे सर्व मराठमंडळ वारीत येते, गेल्या काही वर्षांपासून तर आयटीयन्सचीही दिंडी येते आहे. ही आस नेमकी येते कुठून ?... उत्तर निश्चित मिळेल, पण ज्ञानदेव ज्या प्रमाणे म्हणतात 'एक तरी ओवी अनुभवावी' त्याप्रमाणे एकतरी वारी अनुभवली तरच...

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news