

सुरेश गायकवाड
पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या खजिन्याची केवळ धार्मिकच नव्हे, तर ऐतिहासिक श्रीमंतीही तितकीच मोठी आहे. पाचव्या शतकापासून ते अगदी विसाव्या शतकापर्यंत अनेक राजे, महाराजे, पेशवे, सरदार आणि संस्थानिकांनी विठुरायाच्या चरणी अनमोल दागिने अर्पण केले आहेत. हा खजिना म्हणजे केवळ सोने, हिरे, मोती आणि माणकांचे भांडार नसून, तो महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचा आणि अखंड भक्तीचा एक अमूल्य ठेवा आहे. प्रत्येक सणाला आणि विशेष पूजेच्या वेळी विठ्ठल-रुक्मिणीला हे पारंपरिक दागिने परिधान केले जातात, तेव्हा त्यांचे रूप अधिकच तेजस्वी आणि मनमोहक दिसते.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती या दागिन्यांचे अत्यंत काळजीपूर्वक जतन करत असून, यातील अनेक दागिन्यांचा काळ ठरवणे आजच्या सुवर्णकारांनाही अवघड वाटते. अठराव्या शतकापासूनच्या नोंदी बडवे समाजाने जपल्या होत्या, तर 1985 पासून मंदिर समितीने त्याची नोंद ठेवली आहे. देवाच्या खजिन्यात 50 हून अधिक प्रमुख अलंकार आहेत. यामध्ये कौस्तुभ मण्यासारख्या अत्यंत मौल्यवान दागिन्यापासून ते सोन्याच्या पागोट्यापर्यंत अनेक वस्तूंचा समावेश आहे.
मोत्यांचा चौकडा जोड व 46 मोत्यांची कंठी (पदकात हिरे, माणिक जडवलेले)
हिर्याची मंडोळी आणि 10 पेट्यांचा सुवर्ण कंबरपट्टा
मौल्यवान मत्स्य हिरे आणि पाचू असलेली माणकाची कंठी
41 पानाच्या हिर्यांचा हार आणि हिरेजडीत बाहुभूषणे
हिरे, पाचू, माणिक जडवलेला शिरपेच आणि हिर्यांचे पैंजण (तोरडी)
सोन्याचे तोडे, टोप, कडे, चंद्रहार, मोहरांचा हार आणि पुतळ्यांच्या माळा
रुक्मिणीमातेचा खजिनादेखील 82 अनमोल अलंकारांनी सजलेला आहे. विशेष म्हणजे, यातील तब्बल 35 मौल्यवान अलंकार हे उत्पात समाजाने स्वतः घडवून देवीला अर्पण केले आहेत. मातेच्या दागिन्यांमध्ये श्रीमंत बाजीराव पेशव्यांनी दिलेली 60 मोहरांची माळ, शिंदे सरकारने दिलेली मोत्याची कंठी, हिरेजडीत गरसोळी, तानवड आणि पाचपदरी शिंदे हार (कमालखाणी) यांचा समावेश आहे.
कौस्तुभ मणी : देवाच्या खजिन्यातील सर्वात मौल्यवान दागिना. यात 12 हिरे आणि मध्यभागी कौस्तुभ मणी आहे.
बाजीराव कंठी : शेवटचे बाजीराव पेशवे यांनी अर्पण केलेली 46 सारख्या आकाराच्या मोत्यांची कंठी. याच्या मधोमध हिर्याचे लोलक आहे.
मत्स्य : कानातील या अलंकारात 145 हिरे, 79 माणिक आणि 588 पाचू जडवलेले आहेत. हे कोणी अर्पण केले याची नोंद नाही.
लफ्फा : ग्वाल्हेरचे राजे जयाजीराव शिंदे यांनी अर्पण केलेला
हिरे, माणिक आणि पाचूजडित हार.
हिर्याची मोरमंडोळी : श्रीमंत अहिल्यादेवी होळकर यांनी अर्पण केलेल्या या दागिन्यात 36 हिरे आणि 12 नीलमणी आहेत.
मोहरांची माळ : सुमारे दोन किलो वजनाची ही माळ एका अज्ञात भक्ताने अर्पण केली आहे.