Wari 2025: पंढरीचा पांडुरंग 28 युगांपासून योगमुद्रेत; मूर्ती अभ्यासकांनी उलगडले मूर्तीच्या योगमुद्रेचे गुपित

ही मूर्ती युगमुद्रेत घडवली त्यामुळेच ‘सावळे सुंदर, रूप मनोहर’ असे वर्णन संतांनी केले आहे
wari news
Vitthal murtipudhari
Published on
Updated on

Ashadhi Wari 2025

पुणे : पंढरीच्या पांडुरंगाचे विलोभनीय रूप पाहून आपण देहभान का हरपतो? त्या मूर्तीत असे काय वेगळे आहे, ज्यामुळे दर्शन घेताच आपल्या मनाला अवर्णनीय आनंद, शांती मिळते अन् चित्तवृत्ती निरोध प्रदान करते. याचे गुपित मूर्तीच्या घडणावळीत दडले आहे. ही मूर्ती युगमुद्रेत घडवली आहे. त्यामुळेच ‘सावळे सुंदर, रूप मनोहर’ असे वर्णन संतांनी केले, याचे प्रथमच सविस्तर शास्त्रीय पद्धतीचे विश्लेषण ‘पुढारी’च्या माध्यमातून समोर येत आहे. पुणे शहरातील 92 वर्षांचे जागतिक कीर्तीचे ज्येष्ठ मूर्ती अभ्यासक तथा डेक्कन कॉलेजचे माजी कुलगुरू डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या आजवरच्या अभ्यासातून, त्यांनी पांडुरंगाच्या मूर्तीला योगमूर्ती, असे म्हटले आहे. मूर्तीचे प्रकार किती असतात? पांडुरंगाच्या मूर्तीला योगमूर्तीच का म्हटले आहे? याची माहिती प्रथमच देगलूरकर यांनी सांगितली, ती त्यांच्या शब्दांत

पंढरीच्या पांडुरंगासमोर आपण गेलो की, निर्विचार आणि निर्विकल्प समाधीत आपोआप जातो. खूप काही ठरवून गेलेला माणूस या मूर्तीसमोर जाताच देहभान हरपून निर्विचार होतो. आपण या देवासमोर काही मागावे, ही भावनाच उरत नाही. याचे उत्तर मूर्तीच्या विलक्षण आशा वेगळ्या प्रकारच्या घडणावळीत दडलेले आहे. ही संपूर्ण मूर्ती योगमुद्रेत घडवली आहे. पांडुरंगाच्या चेहर्‍यावर योगी पुरुषाचे अष्टसात्त्विक भाव आहेत. त्यामुळे भक्त निर्विकल्प समाधीतच जातो. त्यामुळे संत ज्ञानेश्वरांनीदेखील आपल्या अभंगात ‘ऐसा हा योगीराजू,’ असे म्हटले आहे.

wari news
Ashadhi Wari | लक्ष लक्ष नयनांनी अनुभवला माऊलींचा रिंगण सोहळा

चार प्रकारांत मूर्ती घडविण्याची कला

आपल्या देशात दुसर्‍या शतकापासून मूर्तिकला जोपासण्याचे संदर्भ सापडतात. त्या घडविताना प्रामुख्याने चार प्रकारांत मूर्ती घडवलेल्या दिसतात. पहिला प्रकार ‘योगमूर्ती’, दुसरा प्रकार ‘वीरमूर्ती’, तिसरा प्रकार ‘भोगमूर्ती’ आणि चौथा प्रकार म्हणजे ‘अभिचारकमूर्ती’ आहे. यात योगमूर्ती ही फार दुर्मीळ मानली आहे. ती पंढरपूरच्या विठ्ठलाची आहे. समचरण पाय असलेली, ताठ मान, हात कटीवर म्हणजे कमरेवर आणि द़ृष्टी चरणावर आहे. अशा त्या मूर्तीसमोर जाताच आपल्यातील योगप्रवृत्ती जागरूक होते. नकळत आपली योग साधनाच सुरू होते आणि काही मागावेसेच वाटत नाही. चित्त निर्विचार होऊन जाते, अशा मूर्तीला योगमूर्ती म्हटले आहे.

तर, भोगमूर्ती म्हणजे ज्या मूर्तीसमोर जाऊन आपल्याला सांसारिक गोष्टी मागाव्या वाटतात. त्या मूर्तीचा हात आशीर्वादाचा म्हणजे अभयमुद्रेत असतो किंवा खाली वरदमुद्रेत म्हणजे दान देणारा असतो. त्या मूर्तीला भोगमूर्ती म्हटले आहे. उदाहरण द्यायचे झाले तर तिरुपती बालाजीची मूर्ती ही भोगमूर्ती आहे. त्यामुळे तिच्यासमोर सकाम भावना घेऊन लोक जातात. वीरमूर्ती प्रकारात मारुती आणि महिषासुरमर्दिनी देवी यांचा समावेश होऊ शकतो. या मूर्तींच्या मुद्रेतच वीररस साकारलेला असतो. त्यामुळे आपल्याला शौर्याची उपासना करायची असेल, तर मारुती आणि महिषासुरमर्दिनीची उपासना करतात. व्यायामशाळेमध्ये नेहमी मारुतीची मूर्ती असते, याला वीरमूर्ती म्हटले आहे. अभिचारकमूर्ती म्हणजे तंत्रमंत्राची उपासना करण्यासाठी घडवलेली मूर्ती होय. या मूर्तीदेखील दुर्मीळ स्वरूपात आढळतात. गणपती आणि देवीच्या मूर्तीचा समावेश यात असतो.

wari news
Ashadhi Wari | आषाढी वारी सुरक्षित स्वच्छ, सुंदर वारी ठरेल : उपमुख्यमंत्री शिंदे

फक्त पांडुरंगावरच शेकडो अभंग

सहाव्या शतकापासून पांडुरंगाच्या मूर्तीचा इतिहास सापडतो. त्या आधीचे फार पुरावे उपलब्ध नाहीत. बाराव्या शतकापासून या मूर्तीबाबत जास्त पुरावे सापडतात. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्यापासून पुढे अनेक संतांनी अभंग रचले. आजवर इतकी अभंगरचना भारतातच नव्हे, तर जगात दुसर्‍या कोणत्याही देवावर रचली गेली नाही हे या मूर्तीचे विशेष आहे.

अठरापगड जातींना एकत्र आणणारा देव

पांडुरंग हा सर्वांचा आवडता देव आहे. त्याने अठरापगड जातींना एकत्र आणायचे काम केले आणि तो करतोच आहे. कारण, या देवाला काहीच लागत नाही. गळ्यात तुळशीमाळ आणि कपाळी बुक्का इतकेच सांगितले आहे. त्यामुळेच हा देव सर्वांना भावतो. दरवर्षी जगन्नाथपुरीलादेखील लाखो भाविक जातात. तरी त्या देवावर इतके अभंग रचले गेले नाहीत. पांडुरंग हा देव अत्यंत शांत, स्तब्ध असा उभा आहे. दिव्याची वात वार्‍यानेही अजिबातही हलणार नाही अशी जी अवस्था असते तीच पांडुरंगाची आहे, असेही वर्णन संतांनी केले आहे.

योगमूर्तीची वैशिष्ट्ये काय?

पांडुरंगाच्या मूर्तीला योगमूर्ती का म्हणावे? ही मूर्ती सरळ, ताठ उभी आहे. पाय समचरण असून, मान ताठ आहे आणि नजर पायावर स्थिर आहे. डाव्या हातात शंख आणि उजव्या हातात कमळ आहे, हे योगाचे लक्षण सांगितले आहे. पांडुरंगाचे वर्णन करताना म्हटले आहे की, ‘परब्रह्म लिंगम भजे पांडुरंगम्’. या मूर्तीकडे पाहून आपल्यातील सात्त्विक भाव बाहेर येतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news