वारकरी संप्रदायाचे उपास्य दैवत पांडुरंग आहे आणि या दैवताजवळ जाण्याची, त्याच्या स्वरूपाला जाणून घेण्याची स्वल्पवाट म्हणजे पंढरीची वारी आहे. अनेक संप्रदायाचे उपास्य दैवत भलतेच कडक आहेत.
काहींची उपास्य दैवते भक्तावर नाराज झाली की, त्यांना भयगंडाने ग्रासले जाते. अनेकांच्या उपास्य दैवतांच्या चार-चार हातात चार-चार शस्त्रे आहेत; पण वारकर्यांचा पांडुरंग लागत नाही, मागत नाही, नाराजही होत नाही. ज्याच्या हातात एकही शस्त्र नाही.
जर भक्ताने त्याची तनु, मनु, जीवेभावे सेवा केली, तर तोही भक्तांसाठी सेवाधारी होतो. या सावळ्यास जप, तप, यज्ञ, याग यापैकी कशाचीच गरज लागत नाही. भक्तांच्या भेटीसाठी तो बाहों सरसून यारे! यारे! अवघे जण म्हणून हाकारतो. वारकर्याला उराउरी भेटायला तो स्वतःच उत्सुक असतो. ज्याच्या द़ृष्टीचे, चरणांचे आणि भक्त वत्सलतेचे वर्णन करताना तुकोबाराय म्हणतात,
समचरण द़ृष्टी विटेवरी साजरी
तेथे माझी हरि वृत्ती राहों ।
आणिक न लगे माईक पदार्थ
तेथे माझे आर्त नको देवा ।
वारकर्यांच्या अंतःकरणात आपल्या प्रेमाची स्वर बासरी वाजवून झाडा-माडात, गुरा-पाखरात, मुला-माणसांत, अणु-रेणूत प्रकट होणारा काळ्या आईचा साक्षात्कार आपल्या सावळ्या रूपातून करून देणारा भोळ्या भाविकांचे जीविचे जीवन म्हणजे पांडुरंग. खरे तर वारी ही केवळ औपचारिक फेरी नाही, तर त्या वाळ्या विठ्ठलाच्या विराट रूपाचे दर्शन म्हणजे वारी. जेव्हा वारकर्यांचा देह विठ्ठल नामाने भरून जातो तेव्हा त्याच्या मनातून काम, क्रोधादिक षड विकार आपोआपच पळ काढतात.
आपल्या प्रत्येक कामाच्या पाठीमागे पांडुरंगाचे अधिष्ठान आहे आणि केवळ आपल्या बरोबरच नाही, तर चरा-चरात जो भरून उरला आहे. ही व्यापक जीवनद़ृष्टी पंढरीच्या वारीने प्राप्त होते. फक्त गरज आहे ती ज्ञानोबा, तुकोबा आणि विठोबाशिवाय शरीर, इंद्रिये, वाणी आणि मन यांच्यात दुसरा विषयच येता कामा नये. आज वारीचा महासागरासारखा विस्तार होत आहे. पण, या विस्तारात विठुनामाची खोली तर कमी होत नाही ना!
याची दक्षता प्रत्येक दिंडीच्या प्रमुखांनी घ्यायला हवी. कारण, निसर्गाचा एक नियम आहे, जेव्हा नदीची रुंदी आणि विस्तार प्रचंड प्रमाणात होते तेव्हा तिची खोली हळू हळू कमी होऊ लागते. तेव्हा वारीकर वारकर्यांनो, आपण ज्या उपास्य देवतेच्या भेटीला निघालोय तो जर तना-मनात भरून उरला तर नैतिकता, अनैतिकता, पाप, पुण्य यांचा प्रश्नच शिल्लक राहत नाही. आपण जे कर्म करतो, त्यालाच शुद्ध सत्त्वगुणी पुण्याईचा सुगंध प्राप्त होतो आणि अष्ट सात्त्विक भावाच्या भरत्यासह ज्ञानोबा माऊलीच्या शब्दात आपणही म्हणू लागतो,
पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती
रत्नकीळ फाकती प्रभा ।
अगणित लावण्य तेज पुजांळले
न वर्णवें तेथेची शोभा
कानडा वो विठ्ठलु करनाटकु ।
तेणे मज लावियेला वेधु॥
- प्रा. शिवाजीराव भुकेले, (लेखक संत साहित्याचे अभ्यासक व ख्यातनाम व्याख्याते आहेत.)