

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : गहुंजे येथे सुरू असलेल्या भारत विरुद्ध बांगलादेश क्रिकेट सामन्याचे तिकीट ब्लॅक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली. आरोपी बाराशे रुपयांच्या तिकिटांची १२ हजार रुपयांना विक्री करत होते. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने मुकाई चौक, रावेत येथे ही कारवाई केली. गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडीयमवर वर्ल्डकपचे सामने होणार आहेत. आज भारत विरुद्ध बांगलादेश हा पहिला सामना होत आहे. या पार्श्वभूमीवर सध्या वेशातील पोलिस क्रिकेट स्टेडीयमच्या आवारात तैनात करण्यात आले आहेत.
दरम्यान, गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला माहिती मिळाली की, मुकाई चौक, रावेत येथे कोहिनूर सोसायटीच्या समोर काहीजण क्रिकेट सामन्याची तिकिटांची जास्त दराने विक्री करीत आहेत. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे भारत विरुद्ध बांगलादेश क्रिकेट सामन्याची पाच तिकिटे मिळून आली आहेत. आरोपी एका तिकिटाची बारा हजार रुपयांना विक्री करीत असल्याचे चौकशीत समोर आले. पोलिसांनी आरोपींकडून पाच तिकिटे, ३८ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल, सात हजार रुपयांची रोकड, असा एकूण ५१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
हेही वाचा