

खेड शिवापूर : पुढारी वृत्तसेवा : या सणांसाठी दुष्काळ परिस्थिती ही झेंडूसह विविध फुलांची पिके घेतलेली आहेत. मात्र, श्रावण व गणेशोत्सव काळात फुलांना काहीच बाजारभाव मिळाला नाही आणि तीच परिस्थिती नवरात्रोत्सवातदेखील दिसून येत आहे. नवरात्रोत्सव सुरू होऊन चार दिवस झाले, तरी झेंडू, शेवंती, कापरी, बिजली, अष्टर अशा अनेक फुलांचे बाजारभाव पडले आहेत.
संबंधित बातम्या :
सणासुदीच्या काळात चांगले दर मिळतील या आशेने दुष्काळी परिस्थिती असतानाही शेतकर्यांनी 1 रुपया ते 4 रुपया किंमतीची फुलांची रोपे परराज्यातून तसेच जिल्ह्याच्या अनेक ठिकाणांहून आणून आपल्या शेतात लागवडी केल्या व मोठ्या कष्टाने फुल शेती पिकवली, परंतु नवरात्रोत्सवाचे चार दिवस झाले, तरी फुलांचे बाजारभाव पडलेले आहेत ही चिंतेची बाब आहे. यामुळे पुढील काळातील शेतकर्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. साधारण अर्धा एकर शेतीला पंधरा ते अठरा हजार रुपये खर्च केला जातो. आताच्या बाजारभावाने जर फुले विकली गेली, तर साधारण वीस ते बावीस हजार रुपये होतील. म्हणजेच दोन महिन्यांमध्ये जेमतेम चार ते पाच हजार कमाई होईल. दोन महिने केलेले कष्ट, यासाठी दिलेला वेळ, त्याचे संगोपन या सर्व गोष्टी पाहता आर्थिक बाबतीत कुठलाही ताळमेळ बसत नाही हे लक्षात येते.
परजिल्ह्यातील आवक, प्लास्टिक फुलांची अडचण
दुष्काळ परिस्थितीतही अनेक शेतकर्यांनी फुल शेती पिकवली. त्यातच हिंगोली, नंदुरबार या जिल्ह्यांतून फुलांची मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे याचाही फटका पुणे जिल्ह्यातील शेतकर्यांना बसत आहे. बाजारात प्लास्टिक फुलांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे नैसर्गिक फुलांना मागणी कमी होत आहे. सरकारने प्लास्टिक बंदी घातली आहे तर मग प्लास्टिक फुलांवर बंदी का घालत नाही? हा मोठा प्रश्न आहे, असे मत नवविकास युवा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दादासाहेब पवार यांनी दै. 'पुढारी'कडे व्यक्त केले.