

पुढारी ऑनलाईन डेस्क
Russia-Ukraine crisis : रशिया युक्रेनवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. याच दरम्यान युक्रेनमधील पूर्व भागात रशियन समर्थक फुटीरतावादी (Separatists) आणि युक्रेनियन सैन्य यांच्यात झालेल्या संघर्षात एक युक्रेनियन सैनिक ठार झाल्याचे वृत्त समोर आले आहे. पूर्व युक्रेनमधील बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या शहराच्या उत्तरेला असलेल्या भागांत अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचेही वृत्तात म्हटले आहे.
रशिया समर्थक फुटीरतावाद्यांनी युक्रेनच्या पूर्व भागात आज सकाळी १२ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन (ceasefire violations) केले आहे, असा दावा युक्रेनियन सैन्याने (Ukrainian military) केला आहे. याआधीच्या २४ तासांत दिवसांत रशिया समर्थकांनी ६६ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचे युक्रेनने म्हटले आहे.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी, रशियाने युक्रेनवर हल्ला करण्याची संपूर्ण तयारी केली असल्याचे म्हटले आहे. बायडेन यांनी शुक्रवारी रात्री संबोधित करताना दावा केला की, मित्र राष्ट्रांच्या प्रमुखांशी बोलल्यानंतर त्यांनी सांगितले की, रशियाच्या युद्ध तयारीबाबत त्यांना गुप्त माहिती मिळाली आहे. रशियाने सर्वात आधी युक्रेनची राजधानी कीव वर हल्ला करण्याची योजना आखली आहे.
कीव मध्ये २८ लोक राहतात आणि आणि रशियान हल्ला केल्यास त्यांचा जीव धोक्यात येईल. तसेच युक्रेनला चिथावणी देण्याच्या हेतूने रशियन समर्थक मोठ्या प्रमाणात शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहेत. पण अमेरिका आणि आमची मित्र राष्ट्रे युक्रेनच्या लोकांना पाठिंबा देतील. आम्ही रशियाला त्याच्या कृतींसाठी जबाबदार धरू, असा इशारा बायडेन यांनी दिला आहे.
रशियन सैन्याने बेलारूसपासून दक्षिणेकडील काळ्या समुद्रापर्यंत आणि युक्रेनच्या सीमांना वेढा दिला आहे. यामुळे संघर्ष निर्माण झाला आहे. रशियाने युक्रेनच्या सीमेवर हजारो सैनिकांच्या तुकड्या तैनात केल्या असल्याचा दावा याआधी अमेरिकेने केला होता.
रशियाने युक्रेनच्या (Russia-Ukraine crisis) सीमेवरुन सैन्य माघारी घेतल्याचे वृत्त अमेरिकेने फेटाळून लावले आहे. उलट रशियाने युक्रेनच्या सीमेजवळ आणखी ७ हजारांहून अधिक सैनिकांच्या तुकड्या तैनात केल्या आहेत, असा दावा अमेरिकेच्या एका अधिकाऱ्याने नुकताच केला होता. रशियाने युक्रेनच्या सीमेवरील सैन्य तैनाती कमी केल्याचा दावा अमेरिकेने फेटाळून लावला आहे. 'रशियाचा सैन्य माघारीचा दावा खोटा आहे,' असे अमेरिकेच्या अधिकाऱ्याने एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले होते.