

पुढारी ऑनलाईन डेस्क : Sunil Gavaskar : होळकर स्टेडियमवर भारतीय संघाला (Team India) ऑस्ट्रेलियाकडून पराभवाला सामोरे जावे लागले आहे. पहिल्या दोन सामन्यांमध्ये टीम इंडियाने ज्या प्रकारचा खेळ दाखवला, त्यामुळे टीम इंडिया तिसरी कसोटी आरामात जिंकेल असे वाटत होते. मात्र ऑस्ट्रेलियाने भारताला आपल्याच जाळ्यात अडकवले. ऑस्ट्रेलियन संघाने फिरकीच्या सहाय्याने खेळपट्टीवर वर्चस्व राखले आणि भारताचा नऊ गडी राखून पराभव केला. या पराभवाने निराश झालेले भारताचे माजी क्रिकेटर सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी रवींद्र जडेजाला (Ravindra Jadeja) या पराभवाला जबाबदार धरले.
गावसकर (Sunil Gavaskar) यांनी जडेजाच्या पहिल्याच दिवशी केलेल्या चुकीवर प्रकाश टाकला आहे. त्यांच्या मते, जडेजाच्या एका चुकीने भारताला बॅकफुटवर ढकलले आणि त्यामुळे भारतीय संघाच्या वाट्याला पराभव आला. जडेजाने सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियन फलंदाज मार्नस लबुशेनला बाद केले होते पण हा चेंडू नो बॉल ठरला होता.
लाबुशेन बाद झाला पण नो बॉलमुळे तो वाचला. यानंतर त्याने सलामीवीर उस्मान ख्वाजासोबत 96 धावांची भागीदारी केली. त्यानंतर पाहुण्या संघाने पहिल्या डावात 197 धावा केल्या आणि भारतावर 88 धावांची आघाडी घेतली. ही आघाडी ऑस्ट्रेलियाला खूप उपयुक्त ठरली. भारताच्या दुस-या डावात फिरकी गोलंदाज नॅथन लायनने कहर केला. त्याने एकापाठोपाठ 8 बळी घेऊन रोहित सेनेला 163 धावांमध्ये गुंडाळले. त्यामुळे भारताला केवळ 75 धावांच्या आघाडीपर्यंतच मजल मारता आली. त्यानंतर विजयासाठीचे 76 धावांचे लक्ष्य कांगारूंनी एक विकेट गमावून सहज पार केले.
सामन्यानंतर गावसकर (Sunil Gavaskar) म्हणाले, 'तुम्ही सामन्याकडे मागे वळून पाहिल्यास भारतासाठी तो क्षण खूप जड होता असे तुम्हाला दिसून येईल. लबुशेन शून्यावर बाद झाला. पण त्यानंतर त्याने 96 धावांची भागीदारी केली. त्यापूर्वी भारतीय संघ अवघ्या 109 धावांत गारद झाला होता. माझ्या मते हा टर्निंग पॉइंट ठरला. जडेजाचा तो नो बॉलच भारताच्या पराभवाचे प्रमुख कारण बनला.
सध्याच्या मालिकेतील तीन सामन्याच्या आकडेवारीकडे नजर टाकली तर सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत जडेजा पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत तीन सामन्यात 21 विकेट घेतल्या आहेत.त्याने या मालिकेत भारतासाठी काही चांगल्या खेळीही केल्या. त्याच्या बॅटने तीन सामन्यात 107 धावा केल्या आहेत. जडेजाने नागपुरात खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात 70 धावा केल्या होत्या. इंदूरमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात जडेजाने चार धावा केल्या आणि चार बळी घेतले. जडेजाने दुसऱ्या डावात सात धावा केल्या मात्र त्याला एकही बळी घेता आला नाही.