

वीरगाव(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : आकाशात ढगांची थोडी-बहूत गर्दी होते….घामाच्या धारा सुरु होतात… उकाड्याने कासावस होते… आज नक्की पडणार ही अशी अपेक्षा वाढते.., पण तो अर्थात पाऊस पडत नसल्याने माणसं, जनावरं आणि पिकांचीही काहिली होवून, दुष्काळ झळांनी चराचर हतबल झाले आहे! सुर्योदयापासून सुर्यास्तापर्यंत वाट पाहून थकल्यावर सारे चराचर उद्या तरी तो पडावा, या आशेवर घोर निद्रेत जाते, पणप्रत्येक दिवस सारखाच उगवतो. आता दुष्काळाच्या झळा चराचराला जाणवू लागल्याने चिंतेच्या ढगांचे सावट सगळीकडे दिसत आहे.
रोहिणी, मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा ही सारी नक्षत्रे कोरडीठाक गेल्यावर सुरु झालेल्या पुर्वा फाल्गुनी व त्यानंतरचा हस्त नक्षत्रे तरी पाण्याचं दान देतील, ही आशा फोल ठरण्याची भीती आहे. पावसाचा पाया भक्कम झाला नाही.. शेत- शिवारात पाण्याची चांदणी साचली नाही तरी तो पडेलचं या आशेने शेतकर्यांनी खरीपाचा पेरा उरकला. अधूनमधून पडणार्या सरींवर त्याला जीवदानही मिळाले. आता मात्र पाण्याअभावी सार्याच उभ्या खरीपाने माना टाकल्या आहेत.
बाजरी, सोयाबीन, मका ही सारी पिके आता हातातून जाणारचं आहेत. इतर उभी पिकेही आता जळणी पडली. चारा तर पुर्ण संपल्यात जमा आहे. शेतशिवार आणि डोंगररांगात गवताचे ठिपूसही दिसत नसल्याने जनावरांचीही मारामार सुरु झाली. कृषी पंपांना 24 तास पाणीपुरवठा करणारे पाण्याचे उद्भव आता संपुष्टात आले आणि विहिरींची वाटचाल कोरडेठाक पडण्याकडे सुरु झाली आहे. मुलभूत गरजेच्या वस्तूंची महागाई आहेच आता दुष्काळामुळे अन्नधान्य, भाजीपाला, डाळी महागण्याची शक्यता आहे.
शेत मजूरांचीही कामाअभावी उपासमारीकडे वाटचाल सुरु आहे. शेतकर्यांच्या शेतातील पिकाची दैना व मजुरांची बेरोजगारी यामुळे सर्व आर्थिक विवंचनेत आहेत. मागील वर्षी याचवेळी भरभरुन वाहणारे नदीपात्र, ओढे-नाले सारेच कोरडेठाक आहेत. शेतशिवारातील पशुपक्ष्यांचेही आता खाण्यापिण्याचे हाल सुरु झाले आहेत.
करोना काळात सारेच असहाय्यतेत जगले. अजुनही शेतकर्यांची व्यथा मांडताना कुणी दिसत नाही. आता अस्मानी संकटात त्यांची दखल घ्या. उपाययोजनांची गरज निर्माण झाली आहे.
हेही वाचा