

पुढारी वृत्तसेवा, नवी दिल्ली : काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी हे मनोरंजनाचे राजकारण करतात, असा टोला मारतानाच गांधी यांना देशावर राज्य करणे हा त्यांचा जन्मसिध्द अधिकार असल्याचे वाटते, अशी टीका भाजप नेते व केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यांनी आज (दि.२९) पत्रकारांशी बोलताना केली.(Ashwini Vaishnav)
गांधी यांना त्यांच्या अहंकारामुळे खासदारकी गमवावी लागली असल्याचे सांगत वैष्णव पुढे म्हणाले की, गांधी यांनी ओबीसी समाजाचा अपमान केला आणि जेव्हा न्यायालयाने याबद्दल शिक्षा सुनावली तेव्हा त्यांनी न्यायालयालाच चुकीचे ठरविले. एका खास कुटुंबात जन्म घेतल्यामुळे देशाची घटना, न्यायालय आणि संसदेच्याही वर असल्याचे राहुल गांधी यांना वाटते. आज जे लोक त्यांच्यावरील कारवाई लोकशाहीच्या विरोधातील असल्याचे सांगतात, त्यांनी तत्कालीन संपुआ सरकारच्या कार्यकाळातील भ्रष्टाचाराची मालिका लक्षात ठेवणे गरजेचे आहे. त्या काळात घटनात्मक संस्थांना कमजोर करुन लूटमार करण्यात आली होती.
न्यायालयाने आपल्या विरोधात निकाल कसा काय दिला? असे राहुल गांधी यांना वाटते. घटनेतील कलम 102 दोषी लोकप्रतिनिधींना अपात्र करण्याबाबत आहे. पण हे कलम आपल्यासाठी नाही, असे गांधी यांचे म्हणणे आहे. सर्व भ्रष्टाचारी लोक एका व्यासपीठावर आले आहेत, पण या भ्रष्टाचाऱ्यांचा डाव यशस्वी होणार नाही, असेही वैष्णव यांनी सांगितले.
हेही वाचा