

Pudhari Editorial : जगभरातील कोट्यवधी लोकांच्या हृदयात स्थान मिळवलेली ट्विटरची चिमणी भुर्रर्र उडून गेली आहे. ट्विटरचे मालक अॅलन मस्क यांनी ट्विटरची ही चिरपरिचित चिमणी बदलून त्याजागी एक्स हा नवा लोगो आणला आहे. सर्वसामान्य माणसांच्या किंवा अगदी कुणाच्याही आयुष्यात त्यामुळे काही फरक पडणार नसला, तरी आजच्या समाजमाध्यमांच्या प्रभावाच्या युगातील ही अत्यंत महत्त्वाची घटना आहे. सामान्यातल्या सामान्य माणसापासून अमेरिकेच्या अध्यक्षापर्यंत सगळ्यांना एकत्र आणणारा ट्विटरचा मंच गेल्या दशकभरात जागतिक राजकारणाच्या द़ृष्टीनेही महत्त्वपूर्ण ठरला होता. नजीकच्या काळातही त्याचे ते महत्त्व टिकून राहील, यात शंका नाही. परंतु, बाजारातील तीव— स्पर्धेत टिकण्यासाठी अॅलन मस्क या नव्या मालकाने आपले आवडते एक्स हे चिन्ह लोगो म्हणून आणले असून, त्यासाठी निळ्या चिमणीला ट्विटरच्या बंधनातून मुक्त केले आहे. (Pudhari Editorial)
ट्विटरची चिमणी हे केवळ आभासी जगातले एक निर्जीव चिन्ह नव्हते, तर गेल्या दोन दशकांहून अधिक काळ जगभरातील करोडो लोकांशी त्या चिमणीचे भावनिक नाते निर्माण झाले होते. ट्विटरने केलेला हा बदल डेस्कटॉपवर अंमलात आला असून, मोबाईलवरही तो लवकरात लवकर दिसू शकेल. मायक्रोब्लॉगिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या ट्विटरवर जगभरातील तमाम सेलिबि—टी, राजकारणी, खेळाडू, प्रभावशाली व्यक्ती आपले विचार व्यक्त करत असतात. 140 कॅरेक्टर्सपासून सुरू झालेला अभिव्यक्तीचा प्रवास हळूहळू 280 पर्यंत आणि आता त्याहीपुढे तपशीलवार लेखांपर्यंत पोहोचला. मस्क यांनी ऑक्टोबर 2022 मध्ये ट्विटरची मालकी मिळवल्यापासून त्यात ते सातत्याने बदल करत आहेत. ट्विटरवरील खात्यांच्या अधिकृततेसाठीच्या ब्ल्यू टिकसाठी त्यांनी शुल्क आकारून उत्पन्नाचा आणखी एक मार्गही शोधला. (Pudhari Editorial)
ट्विटरचा निळ्या चिमणीचा लोगो बदलल्यास ट्विटरचा आत्मा हरवेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत होती. परंतु, मालकाने एखादी गोष्ट ठरवल्यास इतरांच्या म्हणण्याला फारसा अर्थ नसतो. त्यामुळे अॅलन मस्क यांनी जाहीर केल्यानुसार इंग्रजी आद्याक्षर एक्स हा नवीन लोगो आलासुद्धा. 'एक्स डॉट कॉम' हे नवे संकेतस्थळही सुरू करण्यात आले आहे. काही महिन्यांनी कंपनीचे नाव अधिकृतरीत्या 'एक्स कॉर्प' करण्यात येणार आहे. मस्क यांचा एक्स अक्षराशी संबंध 1999 सालापासून आहे. त्यांनी 'एक्स डॉट कॉम' नावाची ऑनलाईन बँकिंग कंपनी तयार केली होती. नंतर त्यांनी ती दुसर्या कंपनीत विलीन केली. 2017 मध्ये मस्क यांनी यूआरएल एक्स. कॉम पुन्हा खरेदी केली. या डोमेनचे त्यांच्याशी भावनिक नाते असल्याचे त्यांनी म्हटले होते. मस्क यांनी लिंडा याकिरानो यांना ट्विटरची नवीन सीईओ बनवले, तेव्हा त्यांनी, या प्लॅटफॉर्मचे एक्स, एव्हरीथिंग अॅपमध्ये रूपांतर करण्यासाठी लिंडासोबत काम करण्यास उत्सुक असल्याचे ट्विट केले होते. स्पेसएक्स नावाची त्यांची आणखी एक कंपनी असून, त्यातही एक्स आहेच. Pudhari Editorial
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे जागतिक राजकारण, समाज कारणाच्या द़ृष्टीने मोठे महत्त्व आहे; किंबहुना गेल्या दशकभरात तेच राजकारणाचे प्रमुख माध्यम बनले आहे. फेसबुकची स्थापना 2004 साली झाली आणि त्यानंतर दोन वर्षांनी ट्विटर अवतरले. प्रारंभीच्या काळात हे दोन्ही प्लॅटफॉर्म मर्यादित स्वरूपात होते. कॉर्पोरेट जगतात नोकरी करणारे ज्यांच्या कार्यालयामध्ये कॉम्प्युटर होता, तेच लोक कार्यालयीन वेळेत त्याचा वापर करीत होते. त्यातही प्रारंभी फेसबुकची लोकप्रियता मोठी होती. सामान्यातल्या सामान्य माणसांना आपल्या आयुष्यातील सुख-दुःखाचे क्षण तिथे साजरे करता येत होते. त्याअर्थाने फेसबुक हे सर्वसामान्य माणसांचे माध्यम होते. त्याचवेळी ट्विटरने आपले वेगळेपण अधोरेखित करीत जगभरातील सर्व महत्त्वाच्या लोकांना आपल्या प्लॅटफॉर्मवर आणले. हळूहळू कॉम्प्युटर लोकांच्या घरी आले.
त्यानंतर जेव्हा स्मार्टफोनची क्रांती झाली तेव्हापासून खर्या अर्थाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा धुमाकूळ सुरू झाला. जगभरातील महत्त्वाच्या व्यक्ती आपल्या व्यक्तिगत तसेच सार्वजनिक आयुष्यातील महत्त्वाच्या घोषणा ट्विटरवरून करू लागल्या. मर्यादित शब्दसंख्येमुळे ट्विटरची लोकप्रियता मर्यादित असली, तरी नंतरच्या काळात जी मर्यादा होती, तेच ट्विटरचे बलस्थान बनले. सध्या या कंपनीची वार्षिक उलाढाल अब्जावधीच्या घरात असून, गतवर्षी ती मस्क यांनी खरेदी केली. काही आठवड्यांपूर्वी फेसबुकची कंपनी असलेल्या मेटा कंपनीने थ—ेड हे अॅप सादर केले असून, ट्विटरच्या वापरकर्त्यांना त्याची भुरळ पडली आहे. बदलत्या स्पर्धेच्या युगात आपल्या वापरकर्त्यांना बांधून ठेवण्यासाठी मस्क यांनी हे बदल केल्याचे सांगण्यात येते. काही दिवसांपूर्वी ट्विटर कंपनीने जाहीर केले होते की, ट्विटर जाहिरातींच्या कमाईचा काही भाग निर्मात्यांना शेअर करेल. Pudhari Editorial
अलीकडे, मस्कने ट्विट वाचण्याची मर्यादा आणि कमाई धोरणात बदल केले असून, त्याद्वारे वापरकर्त्यांना अधिक फायदा मिळू शकेल. ट्विटरच्या लोगोमध्ये बदल करण्यामागे अॅलन मस्क यांच्या एक्स या अक्षराबद्दलच्या धारणा आणि आकर्षण कारणीभूत आहे, तसेच बाजारातील स्पर्धेला तोंड देण्यासाठी अधिक सक्षम बनण्याचा प्रयत्नही आहे. ज्या रीतीने हा बदल केला आहे, तो पाहता स्पष्ट होते की, ही फक्त सुरुवात आहे. केवळ वरवरचा बदल करून अॅलन मस्क यांच्यासारखा माणूस थांबणार नाही. ट्विटरसंदर्भातील आणखी काही महत्त्वाचे बदलही लवकरच केले जाऊ शकतील. आजघडीला ट्विटरचे जगभरात सुमारे चारशे दशलक्ष वापरकर्ते आहेत.
ही केवळ संख्या नाही, तर यातील बहुसंख्य वापरकर्ते या प्रभावशाली व्यक्ती आहेत. त्यांच्याकडून इथे व्यक्त केलेल्या भावना या प्लॅटफॉर्मपुरत्याच मर्यादित राहत नाहीत, तर त्यांचा संदर्भ पारंपरिक माध्यमांमधूनही घेतला जातो आणि त्याद्वारे अधिक पटीने लोकांपर्यंत पोहोचतात. त्यामुळे भारतासारख्या देशात आगामी काळात होणार्या निवडणुकांमध्ये ट्विटरसारखा प्लॅटफॉर्म महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. अर्थात, त्यासाठी संबंधितांना आर्थिक किंमतही मोजावी लागणार आहे. तूर्तास ट्विटरची चिमणी भुर्रर्र उडून गेल्याने वापरकर्त्यांना रितेपणाची भावना जाणवणे स्वाभाविक आहे. Pudhari Editorial
हे ही वाचा :