

पुढारी ऑनलाईन डेस्क
#KashiVishwanathDham : उत्तर प्रदेशमधील वाराणसी येथील काशी विश्वेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार व कॉरिडॉरचा लोकार्पण सोहळा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, विश्वनाथ धाम भारताच्या सनातन संस्कृतीचे प्रतीक आहे. हे आमच्या आध्यात्मिक आत्म्याचे प्रतिक आहे. आपल्या पुराणात म्हटले आहे जो कोणी काशीत प्रवेश करतो तो सर्व बंधनमुक्त होतो.
काशी ही काशी आहे. काशी ही अविनाशी आहे. काशीत एकच सरकार आहे. ज्यांच्या हातात डमरू आहे. जिथे गंगा आपला मार्ग बदलून वाहते त्या काशीला कोण रोखू शकेल?, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.
काशी विश्वनाथ धामचे लोकार्पण भारताला एक निर्णायक दिशा देईल. एका उज्जवल भविष्याकडे घेऊन जाईल. हा परिसर आमचे कर्तव्य, सामर्थ्याची साक्ष आहे, असेही ते म्हणाले.
काशी विश्वेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार व कॉरिडॉरचा लोकार्पण सोहळा #KashiVishwanathDham पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी होत आहे. काशी विश्वेश्वर मंदिर परिसराचे सुशोभीकरण होत असल्याने दुकाने, इमारतींनी वेढलेल्या मंदिराने मोकळा श्वास घेतला आहे. दरम्यान, सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी काशी येथे पाेहचले. त्यांनी कालभैरव मंदिरात आरती केली. त्यांनी गंगा नदीत स्नानही केले.
वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 मार्च 2019 रोजी मंदिर परिसराचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प करून पायाभरणीचा शुभारंभ केला होता. या मंदिराबरोबरच बनारसच्या 70 किलोमीटरवरील पंचक्रोशीतील रस्त्यांचाही विकास होत आहे. या तीन टप्प्यांतील योजनांमध्ये 108 मंदिरे, 44 धर्मशाळा आणि कुंड यांचा जीर्णोद्धार करण्यात येत आहे.
या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी देशातील प्रमुख शंकराचार्य, महामंडलेश्वर, श्रीमहंत यांच्यासह सनातन धर्माच्या सर्व पंथांचे प्रमुख आणि मान्यवर काशीत पोहोचले आहेत. त्याचवेळी संपूर्ण काशी मंत्रोच्चार आणि शंखांच्या गजराने गुंजला होता. या विश्वनाथ धाम उद्घाटन उत्सवाचे देशातील 51,000 ठिकाणी थेट प्रक्षेपण करण्यात आले आहे.
हे ही वाचा :