काशी विश्वेश्वर मंदिराने घेतला मोकळा श्वास : काशी विश्वेश्वर कॉरिडॉर नेमका कसा आहे ? | पुढारी

काशी विश्वेश्वर मंदिराने घेतला मोकळा श्वास : काशी विश्वेश्वर कॉरिडॉर नेमका कसा आहे ?

वाराणसी ; राजेंद्र आहिरे : उत्तर प्रदेशमधील वाराणसी येथील काशी विश्वेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार व कॉरिडॉरचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी होणार आहे. काशी विश्वेश्वर मंदिर परिसराचे सुशोभीकरण होत असल्याने दुकाने, इमारतींनी वेढलेल्या मंदिराने मोकळा श्वास घेतला आहे.

वाराणसीमध्ये 13 डिसेंबर रोजी घरोघरी दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. मंदिर परिसरातील मार्गावर भगवे ध्वज तसेच इमारतींना गुलाबी रंग देण्यात येत आहे. जगद्विख्यात प्राचीन काशी विश्वेश्वर याचे मंदिर चोहोबाजूंनी घरे, व्यावसायिक दुकाने आणि इमारतींनी वेढले होते. विश्वेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांना अरुंद गल्ली, दाटीवाटीच्या गर्दीतून मार्ग काढत जावे लागत होते. परिक्रमावेळी दुर्गंधीमुळे भक्तगणांना नाक दाबत अवहेलना सहन करावी लागत होती.

 दुसरीकडे मंदिराशेजारील पूर्व दिशेला असलेल्या मणिकर्णिका घाटावर मृत्यूनंतर मोक्ष, जीवाला मुक्ती देण्यासाठी या ठिकाणी रात्रंदिवस अंतिम अग्निसंस्काराचे कार्य अखंड सुरूच असते. त्यामुळे येथे शवदहनासाठी नेहमीच वर्दळ असते.

या पार्श्वभूमीवर वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 मार्च 2019 रोजी मंदिर परिसराचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प करून पायाभरणीचा शुभारंभ केला. या मंदिराबरोबरच बनारसच्या 70 किलोमीटरवरील पंचक्रोशीतील रस्त्यांचाही विकास होत आहे. या तीन टप्प्यांतील योजनांमध्ये 108 मंदिरे, 44 धर्मशाळा आणि कुंड यांचा जीर्णोद्धार करण्यात येत आहे.

काशी विश्वेश्वर कॉरिडॉर

 काशी विश्वेश्वरwww.pudharinews www.pudharinews

* मंदिराच्या सभोवतालच्या 314 निवासी इमारतींचा वेढा खाली करण्यासाठी 70 कोटी, याशिवाय येथील जागा अधिग्रहित करण्यासाठी तब्बल 390 कोटी एवढा खर्च करण्यात आला.

  • पूर्वीचा 5 हजार फूट असलेल्या या जागेचा विस्तार आता नव्या प्रकल्पांतर्गत तब्बल 5 लाख 27 हजार 300 चौरस फूट एवढा विस्तीर्ण झाला आहे.

*अधिग्रहित जागेवरील मंदिराच्या जीर्णोद्धार व सुशोभीकरणासाठी तब्बल 400 कोटी रकमेचा खर्च करण्यात येत आहे.

  • नवीन रचनेनुसार मंदिर प्रवेशासाठी चारही दिशेला 4 प्रमुख पारंपरिक पद्धतीचे दरवाजे असून एका दरवाजाची उंची 20 फूट तर लांबी 12 फूट आहे.

*सौंदर्यीकरणासाठी मार्बल स्थानिक आणि राजस्थान येथून नक्षीकामाकरिता ग्रॅनाईट मार्बलचा वापर करण्यात आला आहे.

थेट गंगा काठावरून विश्वेश्वराच्या गाभार्‍याकडे

* मंदिराच्या पूर्वेकडील बाजूला असलेल्या 200 मीटर अंतरावरील गंगा घाटापर्यंत 40 फुटांचा भव्य रस्ता करण्यात आला आहे. गंगेच्या पवित्र पाण्यात डुबकी मारून अथवा थेट गंगा घाटातून भगवान काशी विश्वेश्वराच्या गाभार्‍यापर्यंत दर्शनासाठी येणार्‍या भाविकांसाठी घाटावर किमान 70 पायर्‍या बनवण्याचे काम रात्रंदिवस सुरू आहे.

* विशेषतः महाशिवरात्रीच्या दिवशी काढण्यात येणारी महामृत्युंजय मंदिर ते काशी विश्वनाथ मंदिरापर्यंत शिव मिरवणूक; त्याशिवाय साप्ताहिक सोमवार, श्रावण मास, हनुमान जयंती, आरती सार्वजनिक मिरवणूक, शास्त्रीय संगीत, भजन समारंभ अशा धार्मिक उत्सवांप्रसंगी लागणार्‍या 5 ते 6 किलोमीटर रांगा नियंत्रणात येणार आहेत.

* देश-विदेशातून हजारो किलोमीटर अंतरावरून काशी धार्मिक स्थळी येणार्‍या भाविकांना आता गल्ली-बोळाऐवजी सुखकर दर्शनाचा मार्ग खुला होणार आहे.

Back to top button