<---- Script to Prevent Copy Paste-----> <--- Code End----->

काशी विश्‍वेश्‍वर मंदिराच्या सान्‍निध्यात सापडली २५ प्राचीन मंदिरे

काशी विश्‍वेश्‍वर मंदिराच्या सान्‍निध्यात सापडली २५ प्राचीन मंदिरे

वाराणसी ; राजेंद्र आहिरे : काशी विश्‍वेश्‍वर मंदिराला वर्षांनुवर्षे पडलेला घरांचा, इमारतींचा आणि दुकानांचा वेढा अखेर उठला आहे. बाबा विश्‍वेश्‍वराचे मंदिर झाकून टाकणारी ही सर्व बांधकामे हटवली, लोकांचे पुनर्वसन केले आणि त्यातून साकारलेल्या भव्य कॉरिडॉरमुळे काशी विश्‍वेश्‍वर मंदिर परिसरात नव्याने 40 मंदिरे सापडली आहेत. त्यामुळे वाराणसीचे गत वैभवदेखील आता यात्रेकरूंना अनुभवता येईल.

जागतिक प्राचीन शहरांपैकी एक असलेल्या बनारस तथा वाराणसीला गल्ली-गल्लींचे शहर म्हटले जाते. असी आणि वरुणा या नद्यांच्या संगमावर गंगेच्या तीरी वसलेल्या या शहराला काशी, वाराणसी, आनंदवन, बनारस, रुद्रवास, महास्मशान, मुक्‍ती क्षेत्र, श्री शिवपुरी, विद्वानांची नगरी अशा अनेक नावांनीही ओळखले जाते. या पुण्यनगरीत सुमारे 1600 हून अधिक हिंदू मंदिरे आहेत. म्हणून काशीला मंदिरांचेही शहर म्हटले जाते.

गंगा किनार्‍यावरील 88 घाटांपैकी ललिता घाटाजवळ लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेला बाबा विश्‍वनाथ विराजमान आहे. या मंदिराच्या भोवताली तब्बल 314 निवासी इमारतींचा वेढा पडलेला होता. विश्‍वेश्‍वराच्या मंदिरासभोवती सुमारे 50 निवासी घरांचा गराडा होता. या प्रत्येक घरामध्ये 3 ते 5 अशी कुटुंबे राहत.

शिवाय 50 निवासी घरांमध्ये सुमारे 150 कुटुंबे राहत होती. या सर्व रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात आले आणि मंदिराभोवतीच्या इमारती, घरे पाडण्यात आली. या इमारतींमध्ये आणि इमारतींखाली दडलेली 40 मंदिरे समोर आली. त्यातील 25 मंदिरे ही बाबा विश्‍वेश्‍वराच्या मंदिराच्या परिघात आढळली. या 25 मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यात येत आहे.

उघडकीस आलेल्या या मंदिरांमध्ये विश्‍वेश्‍वराच्या गर्भगृहासमोर पूर्वेला रत्नेश्‍वर महादेवाच्या मंदिराचा समावेश आहे. त्याच्या पुढे तारकेश्‍वर महादेवाचे मंदिर आढळले. याच मंदिराच्या पाठीमागे धर्मेश्‍वर महादेवाचे मंदिरही आता दिसते. ही सर्व मंदिरे आता 70 किलोमीटरवरील पंचक्रोशीतील काशी परिक्रमेचा एक भाग झाल्याचे जनसंपर्क अधिकारी पीयूष तिवारी यांनी सांगितले.

बाबाच्या मंदिराला चार दरवाजे

आजवर विश्‍वनाथाच्या दर्शनासाठी चार दिशांनी रांगा लागत. मात्र, या रांगांचा प्रवास दाटीवाटीच्या गल्ल्यांमधून आणि गटारे ओलांडून करावा लागे. नव्या रचनेतही दर्शनाचे हे मार्ग कायम ठेवत प्रशस्त करण्यात आले आणि मंदिर प्रवेशासाठी चारही दिशांना चार प्रमुख पारंपरिक पद्धतीचे दरवाजे उभारण्यात आले.

संगमरवर आणि ग्रॅनाईटचा वापर असलेल्या एका दरवाजाची उंची 20 फूट, तर लांबी 12 फूट आहे. मंदिराच्या पूर्वेला 200 मीटर अंतरावर गंगा घाट लागतो. गंगा घाट ते मंदिर या प्रवासासाठी 40 फुटांचा भव्य रस्ता करण्यात आला आहे. गंगेत डुबकी मारून थेट काशी विश्‍वेश्‍वराच्या गाभार्‍यापर्यंत आता सरळ जाता येईल. त्यासाठी घाटावर किमान 70 पायर्‍या बांधण्यात येत आहेत. (पूर्वार्ध)

गंगेच्या काठावरून ओंजळभर पाणी थेट विश्‍वेश्‍वर मंदिरात

13 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिर जीर्णोद्धार व कॉरिडॉर लोकार्पण होईल, तेव्हा एक मोठा बदल नियमित काशी यात्रा करणार्‍या यात्रेकरूंना दिसेल. तो म्हणजे गंगा आणि विश्‍वेश्‍वर मंदिर यांत आता कोणतीही इमारत उभी नाही. गंगेच्या काठावरून ओंजळभर पाणी घेऊन तुम्ही थेट विश्‍वेश्‍वर मंदिरात जाऊ शकाल.

वाराणसी 'स्मार्ट सिटी'वर केंद्राचाही 403.39 कोटी खर्च

वाराणसीचे रंगरूप बदलण्यासाठी जपानचाही हातभार लागला आहे. जपानच्या मदतीने 186 कोटी रुपये खर्चून रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यात आले आहे. वाराणसी स्मार्ट सिटी प्रकल्पावर केंद्र सरकारही 403.39 कोटी रुपये खर्च करत आहे, अशी माहिती विभागीय आयुक्‍त दीपक अग्रवाल यांनी दिली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news