

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : युवा पिढी व्यसनांमुळे बरबाद होते, हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे एनसीसी कॅडेटनी स्वतः व्यसनांतून दूर रहावे आणि आपापल्या शाळा-महाविद्यालयांच्या कॅम्पसना अंमली पदार्थांपासून मुक्त करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी एनसीसी रॅलीत काढले. (PM Modi)
दरवर्षी प्रजासत्ताक दिनाची परेड झाल्याच्या दोन दिवसानंतर एनसीसीची रॅली काढली जाते. यावेळच्या रॅलीप्रसंगी मोदी यांनी घातलेली पंजाबी पगडी ही चर्चेचा विषय झाली आहे.
यंदा देश स्वातंत्र्याचे सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. जेव्हा युवा देश अशा प्रकारच्या ऐतिहासिक उत्सवाचा साक्षीदार बनतो, तेव्हा उत्सवात वेगळाच उत्साह दिसून येतो, असे सांगून मोदी पुढे म्हणाले की, हा उत्साह आज या मैदानात दिसत आहे पण हे देशाच्या त्या युवा शक्तीचे दर्शन आहे की जे आपले संकल्प पूर्ण करणार आहेत. (PM Modi)
सैनिक शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलींची संख्या वाढत आहे. लष्करात महिलांना मोठी जबाबदारी मिळत आहे. हवाई दलात महिला लढाऊ विमाने चालवित आहेत. अशा स्थितीत मुलींनी जास्तीत जास्त प्रमाणात एनसीसी सामील व्हावे, असा आपला प्रयत्न असला पाहिजे. सर्व युवकांनी 'वोकल फोर लोकल' अभियानात मोठी भूमिका बजावयास हवी.