ट्रकच्या मध्ये लोखंडी पार्टिशन टाकून सुरु होती मद्याची तस्करी ; 32 लाख 74 हजाराचा साठा जप्त, तिघांना ठोकल्या बेड्या | पुढारी

ट्रकच्या मध्ये लोखंडी पार्टिशन टाकून सुरु होती मद्याची तस्करी ; 32 लाख 74 हजाराचा साठा जप्त, तिघांना ठोकल्या बेड्या

धुळे : पुढारी वृत्तसेवा : मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात मद्याची तस्करी करणाऱ्या तिघांना तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहे. विशेष म्हणजे ट्रकच्या मध्ये लोखंडी पार्टिशन टाकून ही तस्करी होत असल्याची बाब उघडकीस आली आहे.

तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक हेमंत पाटील यांना मध्यप्रदेशातून मद्याची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी महामार्गावर सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कोते, उपनिरीक्षक सागर काळे आणि पथकाला कारवाई करण्याकरिता पाठवले. या पथकाने धुळे तालुक्यातील मुकटी शिवारातील हॉटेल मनकरणी या ठिकाणी सापळा लावला. यावेळी एमपी 0 9 एच एफ 99 91 क्रमांकाची ट्रक या हॉटेल जवळ आढळून आली. या ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये कोणताही माल नसल्याचे दिसून आले.

मात्र बाहेरून ट्रकची लांबी पाहता आतमध्ये फेरफार असल्याचा संशय पोलीस पथकाला आला. त्यामुळे त्यांनी गाडीची ताडपत्री काढली असता ट्रकच्या बॉडी मध्ये दोन पार्टिशन केल्याची बाब लक्षात आली. आतल्या भागांमध्ये ऑल सीजन कंपनीचे मद्याचे 255 बॉक्स आढळून आले. याची किंमत बत्तीस लाख 74 हजार असून ट्रकची किंमत दहा लाख रुपये आहे. विशेष म्हणजे या ट्रकमधील मद्य साठा सुरक्षित पोहोचवण्यासाठी जिजे 06 सी एफ 2133 कंपनीची स्कार्पिओ देखील वापरण्यात आली. या स्कार्पिओ मधील दोन जण ट्रकची पायलेटिग करत असल्याची बाब उघडकीस आली आहे.

त्यामुळे पोलीस पथकाने ट्रक चालक पप्पूसिंग रघुनाथ सिंग दोढिया आणि स्कार्पिओ मधील तोसिमउद्दीन रशीदरभाई शेख तसेच उमेश दुर्गादास वसावा या दोघांना ताब्यात घेतले आहे. मध्यप्रदेशातुन नवापूर येथील पिंटू उर्फ गोरख भीमराव गडकरी यांच्याकडे मद्य साठा जात असल्याची बाब निदर्शनास आले. त्यामुळे पुरवठा करणारे, वाहतूक करणारे आणि मद्य तस्करी तसेच सहाय्य करणाऱ्या सहा जणांविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी सांगितले की, मद्यतस्करी मध्ये सहभागी असणाऱ्या कुणालाही सोडले जाणार नाही.

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज.. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. 😃 पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा :

Back to top button