

मागील सहा ते सात वर्ष केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे देशातील भ्रष्टाचार रोखता येतो, असा विश्वास देशवासीयांमध्ये निर्माण झाला आहे. कोणतेही पैसे न देता सरकारी योजनांचा लाभ मिळतो, हेही स्पष्ट होत आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग ( सीबीआय ) आणि केंद्रीय दक्षता आयोग ( सीव्हीसी ) या संस्थांचे काम हे कोणाचाही मनात दहशत निर्माण करण्याचे नाही. तर सर्वसामान्य नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्याचे आहे. ( PM Modi addresses CVC-CBI ) सुराज्यासाठी भ्रष्टाचाराचा अन्याय नष्ट करणे गरजेचे आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केले.
सीबीआय आणि सीव्हीसी अधिकार्यांशी व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यामातून ( PM Modi addresses CVC-CBI ) संवाद साधताना पंतप्रधान मोदी म्हणाले, देशात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत आहे. पुढील २५ वर्षांमध्ये आत्मनिर्भर भारत ही संकल्पना यशस्वी करण्याकडे आपली वाटचाल सुरु आहे, असेही त्यांनी नमूद केले.
भ्रष्टाचाराचे स्वरुप लहान असो की मोठा, यामुळे कोणाच्या तरी हक्क हिसकावला जातो. देशातील सामान्य नागरिक हा आपल्या हक्कांपासून वंचित राहत आहे. तसेच भ्रष्टाचार हा राष्ट्राच्या प्रगतीला मारक आहे. तसेच सामूहिक शक्तीलाही हानी पोहचवत आहे. मागील सहा ते सात वर्षांमध्ये सातत्याने भ्रष्टाचारविरोधात केलेल्या कारवाईमुळेच देशाला धोका देणारे, गरीबांची लूट करणारे कितीही शक्तीशाली असेल तरी केंद्र सरकार त्यांच्यावर कारवाई करतेच, असा विश्वास सर्वसामान्य नागरिकांमध्ये निर्माण होत आहे, असेही त्यांनी सांगितले.
भ्रष्टाचार हा यंत्रणेचा एक भाग आहे, असे पूर्वी मानले जात होते. मात्र २१ व्या शतकातील भारत हा आधुनिक विचारांचा आणि तंत्रज्ञानाचा वापर मानवतेच्या हितासाठी करत आहे. आज देशातील सरकारचा देशातील नागरिकांवर विश्वास आहे. त्यांच्याकडे संशयाच्या नजरेने पाहत नाही. या विश्वासामुळेच भ्रष्टाचाराचे अनेक मार्ग आता बंद झाले आहे. आम्ही सरकारी योजना अधिक सुलभ करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहोत, असेही त्यांनी सांगितले.