

खराळवाडी: पिंपरी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण (वायसीएम) रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी चक्क जन्मनोंदणी वहीमध्ये बाळाच्या जन्माची नोंद केली नाही. ही बाब संबंधित पालकाने वायसीएम रुग्णालयाच्या प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्याने रुग्णालय परिसरात खळबळ उडाली आहे. बाळाचा जन्म 2022 मध्ये होऊन देखील कर्मचाऱ्यांच्या हालगर्जीपणामुळे जन्म दाखल्याची रजिस्टरला नोंद झाली नसून, संबंधित प्रशासनाने अशा वर्करची जिम्मेदारी दाखवून आपली जबाबदारी झटकून टाकली. त्यामुळे पालकांना जन्म दाखला मिळणे कठीण झाले आहे.
सध्या शाळेमध्ये युकेजी, एलकेजी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या जन्मदाखल्याची मागणी वाढली आहे. यासाठी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण (वायसीएम) रुग्णालयात जन्म-मृत्यू कार्यालयात दाखले काढण्यासाठी पालकांची रांग पाहवयास मिळत आहे. आरटीईमधून आपल्या मुलाला शहरातील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश मिळाला तर इयत्ता दहावीपर्यंतच्या शिक्षणाची चिंता मिटेल, या अपेक्षेने पालक वायसीएम रुग्णालयात जन्म दाखला काढण्यासाठी पळापळ करताना दिसत आहेत. आतापर्यंत किती बालकांच्या जन्मनोंदणी बाकी आहेत असा प्रश्न नागरिक करत आहेत.
वायसीएम रुग्णालयात बाळाचा जन्म होऊन चार वर्षे झाले तरी वायसीएम रुग्णालयात जन्म दाखला रजिस्टरला कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे नोंदणी केली नाही. कर्मचाऱ्यांनी बाळाच्या जन्म दाखल्याची नोंद रजिस्टरला केली नसल्याने बाळाच्या जन्म दाखला मिळणे कठीण झाले आहे. अशा बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी संतप्त पालकांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे. जन्म दाखल्याची वेळ सकाळी 9 ते 12 आहे, असे संबंधित पालकांना सांगून हे कर्मचारी निवांत बसून असतात. जन्मदाखला कार्यालयात नागरिक नसले तरी नागरिकांना ताटकळत बसावे लागते. दाखल्यासाठी आलेल्यांमध्ये महिला व ज्येष्ठ नागरिकांचा मोठ्या संख्येने समावेश असतो.
शाळा प्रवेशासाठी जन्म दाखल्याची गरज
महापालिकेने जन्म-मृत्यू नोंदणी विभागाबरोबरच सर्व प्रभागातील कार्यालयात जन्म-मृत्यू दाखले देण्याची व्यवस्था केली आहे. सर्व ठिकाणी स्वतंत्र कर्मचारी देखील आहेत. त्यासाठी संगणक प्रणालीच्या माध्यमातून हे दाखले ऑनलाईन वितरित केले जातात. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी देखील जन्म दाखले काढण्यासाठी महिलांची गर्दी होत आहे. जन्ममृत्यू विभागाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका नागरिकांना बसत आहे.
जन्म दाखला कार्यालयाचा हलगर्जीपणा
गेले काही दिवसांपासून जन्म दाखला काढण्यासाठी नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. येथील कारभार ढिसाळ आहे. कर्मचाऱ्यांची वर्तणूक व्यवस्थित नाही. निष्काळजीपणामुळे दाखला मिळण्यास वेळ लागत आहे. अशा तक्रारी दाखले काढण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या आहेत.
गैरसोयीच्या प्रमाणात वाढ
महापालिकेत येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची कार्यालयीन वेळ सकाळी दहा ते सहा वाजेपर्यंत आहे. अर्धा तास लंच ब्रेक असताना दाखले वितरित करणारे कर्मचारी लंच ब्रेकची वेळ संपली तरीही कार्यालयात येत नाहीत. यामुळे कामधंदा सोडून आलेल्या नागरिकांना गैरसोईचा सामना करावा लागत आहे.
बाळाचा चार वर्षांपूर्वी वायसीएम रुग्णालयात जन्म झाला तरी जन्माची नोंद रजिस्टरला केली नाही. येथील कर्मचारी आपली जबाबदारी झटकून बाळाची ही नोंदणी अशा वर्कर करतात कदाचित त्यांच्याकडून करायची राहिली असेल म्हणून जन्म दाखल्याची नोंद रजिस्टरला सापडत नाही, असे वायसीएम रुग्णालयातील जन्म मृत्यू कार्यालयातील कर्मचारी सांगतात. दरम्यान बाळाच्या पालकाने वायसीएमचे अधिष्ठाता डॉ. राजेश वाबळे यांची भेट घेतली असता त्यांनी संबंधित विभागाकडे दोन कर्मचारी पाठवून बाळाची जन्म नोंदणी रजिस्टरला करून घेण्याच्या सूचना दिल्या. कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी.
सिद्धार्थ सिरसाठ, पालक