

पिंपरी: महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने गर्भाशयमुखाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी राबविण्यात येत असलेल्या एचपीव्ही (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) लसीकरण मोहिमेस सुरुवात झाली असून, आत्तापर्यंत एकूण 119 मुलींना लसीकरण करण्यात आले आहे. महिलांच्या दीर्घकालीन आरोग्य सुरक्षिततेसाठी आणि समाजातील कर्करोगाचे प्रमाण कमी करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरत असल्याचे मत वैद्यकीय विभागाच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे.
भारत सरकारच्या सध्याच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार 14 वर्षांच्या मुली (ज्यांनी 14 वा वाढदिवस साजरा केला आहे पण 15 वर्षे पूर्ण झालेली नाहीत) या एचपीव्ही लसीसाठी पात्र आहेत; परंतु काही परिस्थितींमध्ये एचपीव्ही लसीकरण दिले जाणार नाही. यामध्ये 14 वर्षांच्या वयोगटाबाहेरील मुली, पूर्वी एचपीव्ही लस (गार्डासिल किंवा सर्वाव्हॅक) घेतलेली असल्यास, लस किंवा तिच्या घटकांमुळे ॲलर्जी असणाऱ्या मुलींना; तसेच गंभीर आजार असलेल्या मुलींना ही लस दिली जाणार नाही. अशा प्रकरणांमध्ये संबंधित व्यक्ती पूर्णपणे बरी झाल्यानंतरच लसीकरण करणे आवश्यक आहे.
पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत एचपीव्ही लस मोफत दिली जात आहे. तसेच सर्व लाभार्थ्यांची नोंद यू-विन ( ण- थखछ) पोर्टलवर करण्यात येत आहे. नागरिकांनी आपल्या 14 वर्षे वयोगटातील मुलींना नजिकच्या महापालिका रुग्णालयात नेऊन मोफत एचपीव्ही लसीकरणाचा लाभ घ्यावा आणि कर्करोगमुक्त भविष्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन यावेळी महापालिकेच्या वैद्यकीय विभागातर्फे करण्यात आले.
या उपक्रमात महापौर रवी लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात 14 वर्षे वयोगटातील मुलींसाठी एचपीव्ही लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.
एचपीव्ही लसीकरण मोहिमेसाठी आवश्यक मनुष्यबळ, सुविधा आणि औषधसाठा उपलब्ध आहे. तसेच सर्व डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी या मोहिमेची अंमलबजावणी प्रभावीपणे करीत आहेत. पालकांनी पुढाकार घेऊन आपल्या मुलींचे लसीकरण वेळेत करून घ्यावे.
डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी-चिंचवड