

पिंपरी: पुणे मेट्रोलाईन-3 अर्थात हिंजवडी, माण ते शिवाजीनगर प्रकल्पाने प्रवासी सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने निर्णायक टप्पा गाठला आहे. मेट्रो सुरक्षितता व तांत्रिक मानकांची पडताळणी करणाऱ्या रिसर्च डिझाइन्स अँड स्टँडड्र्स ऑर्गनायझेशनची अनिवार्य तपासणी नुकतीच यशस्वीरीत्या पूर्ण झाली. ही प्रक्रिया मेट्रो संचालनासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
पीएमआरडीएच्या माहितीनुसार, प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या मेट्रो गाड्यांच्या (रोलिंग स्टॉक) पुरवठा झाला आहे. 14 मेट्रो प्राप्त झाले असून, मंजूर वेळापत्रकानुसार एकूण 22 गाड्या लवकरच उपलब्ध होणार आहेत. या आधारे टप्प्याटप्प्याने चाचण्या, ट्रायल रन आणि पुढे नियमित प्रवासी सेवा सुरू करण्याची तयारी केली जाणार आहे.
दरम्यान, स्थानकांवरील नागरी कामे, प्रणाली बसवणे आणि अंतर्गत सज्जता या सर्व आघाड्यांवर काम वेगात सुरू आहे. स्थानकांच्या इमारती, प्लॅटफॉर्म, प्रवेश-निर्गमन सुविधा तसेच अत्यावश्यक सेवा जवळपास पूर्णत्वास येत असून, संपूर्ण प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधला जात आहे. सद्यस्थितीत नियोजित वेळापत्रकानुसार कामे सुरू असून, 31 मार्चपर्यंत पुणे मेट्रोलाईन-3 वरील बहुतांश स्थानके प्रवाशांसाठी खुली करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.