

पिंपरी : मुळशी तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते राजाभाऊ हगवणे यांची सून वैष्णवी शशांक हगवणे (24) हिने आत्महत्या केली की, तिची हत्या करून आत्महत्येचा बनाव करण्यात आला, याचा छडा लावणे हे पोलिसांसमोरील मोठे आव्हान ठरत आहे. दरम्यान, ससून रुग्णालयात करण्यात आलेल्या शवविच्छेदन अहवालातून अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या असून, वैष्णवीच्या माहेरच्या वाकड येथील कस्पटे कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आहे.
डॉ. जयदेव ठाकरे व डॉ. एच.एस. ताटिया यांनी स्वाक्षरीत सादर केलेल्या शवविच्छेदन अहवालात वैष्णवीचा मृत्यू गळा आवळल्यामुळे (ligature compression of neck) झाला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
सुनेच्या संशयास्पद मृत्यूनंतर तिचा सासरा राजेंद्र हगवणे याने मुलाला घेऊन पलायन केले आहे. दरम्यान, पोलिसांनी पती, सासू आणि नणंद यांना अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना 21 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. वैष्णवी शशांक हगवणे (वय 24) असे संशयास्पद मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे. पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिष्मा हगवणे अशी पोलिस कोठडीत असलेल्यांची नावे आहेत. सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे आणि दीर सुशील राजेंद्र हगवणे हे अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरु आहे. राजेंद्र हगवणे हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा राज्य कार्यकारिणी सदस्य आहे. बावधन पोलीस तपास करत आहेत.
तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी मारहाणीच्या खुणा (multiple blunt injuries) सुद्धा आढळून आल्या आहेत. तसेच, अंतर्गत अवयव (viscera) आणि इतर नमुने रासायनिक तपासणीसाठी राखून ठेवण्यात आले असून, विषप्रयोगाची शक्यताही तपासली जात आहे.
शवविच्छेदन अहवालात डॉक्टरांनी, हत्या करून गळफास दिला असण्याची शक्यता व्यक्त केली असून, ती गांभीर्याने तपासावी, असे स्पष्ट निर्देश तपास अधिकार्यांना देण्यात आले आहेत.
फॉरेन्सिक अहवाल, कॉल डिटेल्स, सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदारांचे जबाब, तसेच आरोपींची पार्श्वभूमी यांचा अभ्यास करून मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
क्राइम सीनचे बारकाईने निरीक्षण, शवविच्छेदन अहवालातील तपशील, साक्षीदारांचे जबाब आणि डिजिटल पुरावे यांचा सखोल आढावा घेणे तपास अधिकार्यासाठी आवश्यक ठरणार आहे.
प्राथमिकदृष्ट्या ही घटना आत्महत्येसारखी वाटत असली, तरीही शरीरावरील मारहाणीच्या खुणा आणि गळ्याभोवताली असलेल्या स्पष्ट खुणा पाहता, ही हत्या असल्याचा संशय नातेवाईकांना आहे.