

पिंपरी: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी शशांक हगवणे (23) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. भुकूम (ता. मुळशी) येथे शुक्रवारी (दि. 16) दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली.
सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी मानसिक, शारीरिक छळ करून क्रूर वागणूक दिली. तसेच, वैष्णवी हिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याची फिर्याद बावधन पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. (Latest Pimpri News)
वैष्णवी यांचे वडील आनंद ऊर्फ अनिल साहेबराव कस्पटे (51, रा. कस्पटेवस्ती, वाकड) यांनी याप्रकरणी शनिवारी बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, वैष्णवी हिचा पती शशांक राजेंद्र हगवणे (27), सासू लता राजेंद्र हगवणे (50), सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे (57), नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे (24), दीर सुशील राजेंद्र हगवणे (27, सर्व रा. भुकूम, ता. मुळशी) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैष्णवी हगवणे यांनी शुक्रवारी राहत्या घरी गळफास घेतला. वैष्णवी यांनी बेडरूमचा दरवाजा आतून बंद करून गळफास घेतला. काही वेळानंतर पती शशांक हगवणे यांनी दरवाजा ठोठावला.
पत्नी वैष्णवी हिने दरवाजा न उघडल्याने दरवाजा तोडला. त्यानंतर ही घटना समोर आली. वैष्णवी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पुण्यातील ससून रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
दरम्यान, वैष्णवी यांचे वडील आनंद कस्पटे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, वैष्णवी हिचा पती, सासू-सासरे, नणंद आणि दीर यांनी हुंड्यासाठी मानसिक, शारीरिक छळ करून वैष्णवी हिला क्रूर वागणूक दिली. मारहाण करून तिला जाच करून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरले.
वैष्णवी हगवणे यांचा मृत्यू संशयास्पदरित्या झालेला आहे. त्याबाबत अधिक तपास करण्यात येत आहे. त्यामुळे त्याविषयी आत्ताच अधिक बोलणे उचित ठरणार नाही.
- अनिल विभुते, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, बावधन पोलिस ठाणे.