

पिंपरी : मुळा नदी सुधार प्रकल्पामुळे नदी व पर्यावरणाची हानी होत असल्याचा आरोप करत पर्यावरणप्रेमींनी जनआंदोलन सुरू केले आहे. आंदोलकांच्या आक्षेपांमुळे पिंपळे निलख स्मशानभूमीजवळ एका ठिकाणी महापालिकेच्या पर्यावरण विभागाने काम तात्पुरते थांबविण्याचे आदेश संबंधित ठेकेदाराला दिले आहेत. प्रशासनाने काही सुधारणांसाठी हा तात्पुरता निर्णय घेतल्याचे म्हटले आहे.
मुळा नदी सुधार प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात वाकड बायपास ते सांगवी पूल असे नदीकाठ सुशोभीकरणासाठी बांधकाम सुरू आहे. हे प्रकल्प पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने राबविले जात आहेत. संबंधित कामासाठी बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला ठेका देण्यात आला होता. पिंपळे निलख येथील स्मशानभूमीजवळील कामाबाबत नागरिक आणि विविध पर्यावरणवादी संघटनांनी आक्षेप नोंदवले होते. त्यांनी नदीमध्ये टाकला जाणारा भराव आणि नदीकिनारी होणार्या पर्यावरणीय हानीबाबत चिंता व्यक्त केली होती. त्याबाबत जलसंपदा विभागाने महापालिकेस दोन नोटिसाही बजावल्या आहेत. परिणामी या भागातील कामाचा फेरविचार करण्यासाठी महापालिकेने तांत्रिक समितीकडून नव्याने अहवाल मागवला आहे.
महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या 14 मे रोजीच्या पत्रानुसार पिंपळे निलख स्मशानभूमीजवळील भागातील काम तात्पुरते थांबविण्याचे आदेश ठेकेदाराला देण्यात आले आहेत. पुढील आदेश येईपर्यंत कोणतीही कामे करण्यात येऊ नयेत, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. यासंदर्भात नदी बचाव आंदोलन करणार्या कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.