पंकज खोले
पिंपरी: स्थानकांची अपूर्ण कामे, पॅचवर्कचे निखळून पडलेले तुकडे, दुभाजकात टाकण्यात आलेला राडारोडा यामुळे पीएमआरडीएच्या मेट्रोचे काम संथगतीने सुरू असल्याचे चित्र आहे. माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गाची काही ठिकाणी पाहणी केल्यानंतर कामाबाबत ढिसाळपणा दिसून आला. मात्र, पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरण प्रशासनाकडून मेट्रो मार्गाचे 86 टक्के कामे पूर्ण झाल्याचा दावा करण्यात येत आहे, परंतु उर्वरित 14 टक्के काम कधी पूर्ण होणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
हिंजवडी आयटीनगरीत काम करणारे तसेच सर्वसामान्य नागरिकांना प्रतीक्षा असलेल्या माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे काम पुढे सरकत नसल्याचे चित्र आहे. मार्च 2025 त्यानंतर सप्टेंबर 2025 मध्ये मेट्रो ट्रॅकवरून धावेल, असे सांगितले जात होते. आता ही मेट्रो सुुरू होण्यास 2026 उजाडेल, असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, पीएमआरडी प्रशासनाकडून मेट्रोच्या कामाची गती वाढली असून, लवकरच सर्व कामे पूर्ण होतील, असे सांगण्यात येत आहे.
हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र, वाहतूककोंडी कमी झाली नाही. त्यामुळे याला सक्षम पर्याय म्हणून मेट्रोचा पर्याय पुढे आला. प्रत्यक्षात सन 2021 मध्ये या मेट्रोच्या कामाला सुरुवात झाली. त्यानंतर सन 2022 मध्ये या प्रकल्पाचा पहिला पिलर उभा राहिला. मात्र, विविध परवानग्या, वाहतूक आणि जागेच्या ताब्याअभावी मेट्रोच्या कामाला विलंब होत गेला. त्यातच टप्प्याटप्याने स्थानकेही वाढली. पीपीपी तत्त्वावर विकसित होणारा हा मेट्रोचा आणि पीएमआडीएकडून उभारणार हा पहिलाचा प्रकल्प आहे. तत्कालीन महानगर आयुक्तांनी मेट्रो कामाकडे लक्ष न घातल्याने मेट्रोबाबत तक्रारी वाढल्या होत्या. मात्र, आता या कामाची गती वाढली असल्याचे सांगण्यात येत आहे.
माण, हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रोसेवेची आयटीयन्सना सर्वांधिक प्रतीक्षा आहे. पिंपरी-चिंचवड व पुणे येथून येणाया आयटीयन्सची संख्या मोठी आहे. रस्त्यावरील सततची वाहतूककोंडी, पावसाळयात साचणारे पाणी, सार्वजनिक वाहतुकीचा अभाव, हिंजवडीतील खराब रस्ते आणि पार्किंग अशा अनेक कारणांमुळे सर्वसामान्यांना या मेट्रो सेवेची प्रतीक्षा आहे. गेल्या तीन वर्षांपासून मेट्रो सुरू होईल, असे सांगण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्षात मेट्रोसेवेस आणखी वर्षभराचा कालावधी लागले, अशी स्थिती आहे.
मेट्रोचे बांधकाम पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, मेट्रो कामावेळेस पडलेले खड्डे अद्यापही बुजविण्यात आलेले नाहीत. गेल्या वर्षीदेखील ही कामे अपूर्ण असल्याने मेट्रोच्या संबंधित ठेकेदारांना सांगण्यात आले होते. अखेर ठेकेदारास नोटीस देण्यात आली आहे. यंदाही या कामावर देखरेख ठेवण्यासाठी एक अभियंता नेमला आहे. तसेच, पीएमआरडीएकडूनही या कामावर देखरेख ठेवण्यात येत आहे.
मेट्रोच्या 23 पैकी 17 स्थानकांची कामे सुरूच आहेत. मात्र, डेपोचे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. टप्प्याटप्प्याने मेट्रोच्या लाईनवर रुळ टाकण्याचे कामदेखील सुरू आहे. तर, 6 स्थानकांचे काम अद्याप हाती घेतले नसल्याचे दिसून आले.