

वडगाव मावळ: वडगाव शहरातील केशवनगर भागात एका महिन्यापूर्वी बिबट्याने दोन-तीन वेळा दर्शन दिले होते. बरोबर एक महिन्याने गुरुवारी (दि. 25) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास येथील दोन तरुणांना याच भागातील ओढ्यावरील पुलावर बिबट्या दिसला आहे. त्यामुळे केशवनगर भागात अजूनही बिबट्याचा वावर असल्याचे निष्पन्न झाले आहे.
शेतकऱ्यांमध्ये घबराट
गुरुवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास गणेश अर्जुन ढोरे व विकास लालगुडे हे दोघेजण इंद्रायणी नदीवर असलेली मोटार बंद करून घराकडे येत होते. दरम्यान, पवारवस्तीच्या पुढे असलेल्या ओढ्यावरील रस्त्याने येत असताना वाहनाच्या लाईटच्या उजेडात समोर बिबट्या दिसला. घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या या दोन तरुणांनी त्याच्यावर सोबत असलेल्या बॅटरीचा प्रकाश मारला, त्यामुळे तो पुलाचे बाजूला असलेल्या झाडीत निघून गेला. बरोबर महिनाभराने पुन्हा बिबट्या दिसल्याने केशवनगर भागातील रहिवाशी व शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे.
उसाच्या शेतात दिसला बिबट्या
याआधी महिन्यापूर्वी केशवनगर भागात खापरे ओढ्यावरील बंधारा परिसरात बिबट्या दिसला असल्याचे तिथे आसपास वास्तव्य असलेल्या धनगर बांधवांनी सांगितले होते. त्यानंतर 25 डिसेंबर रोजी मध्यरात्री याच भागातील पवार वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर बिबट्या दिसल्याचे राहुल पवार या तरुणाने सांगितले. लगेच दुसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जितेंद्र केशवराव ढोरे यांनी त्यांच्या उसाच्या शेतात बिबट्या दिसल्याचे सांगितले. त्याचदिवशी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पुन्हा त्याच भागात उमेश ढोरे यांच्या चाळीमध्ये राहत असलेल्या एका भाडेकरू व्यक्तीने बिबट्याला प्रत्यक्ष पाहिले होते.
वन विभागाने लावले ट्रॅप कॅमेरे
त्यानंतर पुन्हा दोन दिवसांनी खापरे ओढ्याजवळ असलेल्या दिनेश पगडे यांच्या शेतावरील घराजवळ लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये बिबट्या कैद झाला. त्या ठिकाणाहून बिबट्याने एक कुत्राही नेला होता. दरम्यान, त्या दोन दिवसांत मिळत असलेल्या माहितीनुसार वन विभागाचे वन परिमंडळ अधिकारी हिरेमठ यांच्यासह पथकाने सबंधित ठिकाणी भेट देऊन त्याठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावले होते, परंतु, त्यानंतर पुन्हा बिबट्या दिसला नाही, त्यामुळे तो दुसरीकडे गेला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. असे असताना गुरुवारी रात्री पुन्हा याच भागात बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या भागातील ढोरे कुटुंबियांच्या उसाची तोड सुरू आहे, त्यामुळे ऊसतोड कामगारही भयभीत असून ऊस गेल्यानंतर तो इतरत्र भागात जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
एक महिन्यापूर्वी ज्या ज्या ठिकाणी बिबट्या दिसला त्या त्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले होते, परंतु पुन्हा बिबट्या वावर जाणवला नाही, गुरुवारी रात्री मिळालेल्या माहितीनुसार सबंधित ठिकाणी पुन्हा ट्रॅप कॅमेरे लावण्यात येणार आहेत. तसेच, बिबट्याला जेरबंद करण्याच्यादृष्टीने पिंजरा लावण्यासाठी पुढील कार्यवाही सुरू आहे. नागरिकांनी मात्र सतर्क रहावे, रात्रीच्या वेळी बाहेर पडू नये.
एम. एस. हिरेमठ, वन परिमंडळ अधिकारी