

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी गुरुवारी (दि. 6) प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या यादीवर 6 ते 14 नोव्हेंबर असे नऊ दिवसांच्या मुदतीमध्ये नागरिकांना हरकती व सूचना नोंदविता येतील. हरकती व सूचनांवर छाननी, सुनावणी व निर्णय घेण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयानिहाय सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी, अनिल भालसाकळे, माणिक चव्हाण आणि सुनील भागवानी यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आले आहेत. (Latest Pimpri chinchwad News)
सुनावणीसाठी सहशहर अभियंता दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती निवडणुकीच्या अनुषंगाने महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील चिंचवड, पिंपरी, भोसरी आणि भोर या चार विधानसभा मतदारसंघांच्या मतदार यादी प्रभागनिहाय फोडून तयार करण्यात येत आहे. ती प्रारूप मतदार यादी गुरूवारी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्या यादीवर 14 नोव्हेंबरपर्यंत सूचना व हरकती महापालिका भवनातील मतदार यादी कक्ष तसेच, सर्व 8 क्षेत्रीय कार्यालयांत प्रत्यक्ष दाखल करू शकतात. या यादीवरील हरकती व सूचनांवर छाननी, सुनावणी व निर्णय घेण्यासाठी सहशहर अभियंता दर्जाच्या अधिकाऱ्यांची क्षेत्रीय कार्यालयानिहाय प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
यामध्ये अ आणि फ क्षेत्रीय कार्यालयासाठी सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी, ब आणि ग क्षेत्रीय कार्यालयासाठी अनिल भालसाकळे, ड आणि ह क्षेत्रीय कार्यालयासाठी माणिक चव्हाण आणि क आणि ई क्षेत्रीय कार्यालयासाठी सुनील भागवानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्राधिकृत अधिकाऱ्यांना सहाय्य करण्यासाठी संबंधित क्षेत्रीय अधिकारी व कार्यकारी अभियंता (स्थापत्य) यांची सहायक प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित अधिकारी प्रारूप मतदार यादीबाबत नमुना अ आणि ब मध्ये प्राप्त होणाऱ्या सर्व हरकती व सूचनांची तपासणी करून आवश्यक अहवाल प्राधिकृत अधिकाऱ्यांना सादर करावा, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.