

पिंपरी: थेरगाव येथील केजुदेवी बंधाऱ्यातील पाणी मोठ्या प्रमाणात फेसाळल्याचे निदर्शनास आले. नदीपात्रात पांढऱ्या फेसाचे थर तरंगत असल्याने रासायनिक प्रक्रिया केलेले सांडपाणी नदीत सोडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
रात्रीपासूनच पाण्यात फेस तयार होण्यास सुरुवात झाली होती. सकाळी केजुदेवी बंधाऱ्यावर फेसाचे मोठे लोट दिसून आले. बंधाऱ्यात यापूर्वीही विषारी पाण्यामुळे मासे मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. रासायनिक प्रक्रिया केलेले सांडपाणी नदीत सोडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तसेच पर्यावरण कार्यकर्त्यांच्या मते, प्रक्रिया न केलेले घरगुती सांडपाणी पवना नदीत सोडणे हे प्रदूषणाचे मुख्य कारण आहे.
पवना नदी हे पिंपरी-चिंचवडकरांसाठी पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्त्रोत आहे. त्यामुळे नागरिक व पर्यावरण कार्यकर्त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. सकाळी फिरण्यासाठीलेल्या नागरिकांनी नदीतील प्रदूषण पाहून चिंता व्यक्त केली. वारंवार अशा घटना घडत असतानाही ठोस उपाययोजना का केल्या जात नाहीत, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला.
कंपन्यांचे रासायनिक सांडपाणी तसेच प्रक्रिया न केलेले औद्योगिक पाणी थेट नदीत सोडले जात असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. शहरातील अनेक नालेही थेट नदीला मिळत असल्याने पवना नदीचे प्रदूषण वाढत आहे. पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारी ही महत्त्वाची नदी दूषित होत असल्याने भविष्यात गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
महापालिकेचा पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
नदी प्रदूषणामुळे जलचर, वनस्पती आणि पर्यावरण धोक्यात आले असून दूषित पाण्यामुळे साथीचे आजार वाढण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. शासनाने तातडीने हस्तक्षेप करून प्रदूषणाचे मूळ शोधावे आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे. याबाबत पर्यावरण विभागाचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांच्याशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.
केजूदेवी बंधाऱ्याच्या वरील भागात रावेत बंधारा आहे. तिथून पिण्याचे पाणी उचलले जाते. दोन्ही बंधाऱ्याच्या मधल्या भागात पावसामुळे पाण्याची पातळी वाढते. त्यामुळे नदीपात्रावरील सर्व गाळ ढवळल्यामुळे पाण्याला फेस येतो आणि बंधाऱ्यातील पाणी फेसाळते.
मंचक जाधव (उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियत्रंण मंडळ पिं.चि)
अभ्यासकांकडून खूप वर्षापासून याचा शोध घेतला जात आहे की, याठिकाणी कोण रासायनिक पाणी सोडत आहे. बंधाऱ्याच्या आतील बाजूस पाईपलाईन आहेत. त्यातून रासायनिक पाणी बंधाऱ्यात सोडले जाते. बऱ्याचदा रात्रीच्या वेळी हे पाणी सोडण्यात येते. पावसाला सुरुवात झाल्यामुळे हे पाणी सोडले असण्याची शक्यता आहे. कारण पावसाच्या पाण्याबरोबर फेस वाहून जातो.
शुभम पांडे (पर्यावरणप्रेमी)