

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील नालेसफाईचे काम सोमवारपर्यंत (दि. 1) एकूण 92.33 टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित काम आठवड्याभरात पूर्ण करण्यात येणार आहे, असे दावा महापालिकेच्या आरोग्य विभागाने केला आहे.
महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांमार्फत मार्च महिन्यापासून नालेसफाई कामास सुरुवात करण्यात आली होती. शहरातील एकूण 141 नाले आणि 94 हजार 913 मीटर लांबीच्या नाल्यांची साफसफाई करण्यात येत आहे. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात जमा होणाऱ्या पाण्यामुळे पूरस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून महापालिकेकडून पावसाळ्यापूर्वी सर्व लहान व मोठ्या नाल्यांची सफाई केली जाते.
थेरगाव येथील ग क्षेत्रीय कार्यालयाने त्यांच्या हद्दीतील सर्व नाले साफ करून 100 टक्के काम पूर्ण केले आहे. फ क्षेत्रीय कार्यालयाचे 99.61 टक्के आणि ई क्षेत्रीय कार्यालयाचे 98.44 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित विभागांमधील साफसफाईची कामेही अंतिम टप्प्यात असून, पावसाळा सुरू होण्यापूर्वी संपूर्ण शहरातील नाले स्वच्छ करण्यात येणार आहेत.
दरवर्षी पावसाळ्यात नाल्यांमध्ये साचणारा गाळ, प्लास्टिक व इतर कचऱ्यामुळे पाण्याचा प्रवाह अडतो. अनेक भागांत पाणी तुंबण्याच्या घटना घडतात. काही ठिकाणी स्थानिक पूरस्थितीही निर्माण होते. संवेदनशील व पाणी साचण्याची शक्यता असलेल्या भागांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
नालेसफाईची काम शेवटच्या टप्प्यात आहे. स्पायडर मशिन दोनच असल्याने मोठ्या नाल्यांच्या सफाई अडचणी निर्माण होत होत्या. नाल्यांमधून काढलेला गाळ व कचरा तातडीने उचलून त्याची विल्हेवाट लावली जात आहे. पावसाळ्यात समस्या निर्माण होऊ शकणाऱ्या संवेदनशील भागांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
डॉ. प्रदीप ठेंगल, उपायुक्त, आरोग्य विभाग, महापालिका