

तळेगाव दाभाडे: तळेगाव दाभाडे नगर परिषद निवडणुकीत राज्य निवडणूक आयोगाने स्थगिती दिलेल्या जागांवरील प्रक्रिया बुधवारपासून (दि. 10) पुन्हा सुरू झाली. पुनर्प्रक्रियेच्या अर्ज माघारीच्या दिवशी प्रभाग क्रमांक 2 अ मधील अपक्ष उमेदवार तनुजा दाभाडे यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे विभावरी दाभाडे (भाजप), ऋतुजा भगत (अपक्ष) आणि वीणा कामत (शिवसेना) हे अर्ज वैध ठरले असून, 20 डिसेंबरला मतदान होणार आहे.
प्रभाग क्रमांक 7 अ मधील उमेदवार स्नेहा खांडगे आणि वैशाली तांबोळी यांचा मुद्दा न्यायप्रविष्ट आहे, न्यायालयाचा निकाल लागल्यानंतरच या जागेवरील निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. उद्या गुरुवारी न्यायालयाचा निकाल अपेक्षित आहे.
दरम्यान, इतर चारही स्थगित जागांवर प्रत्येकी दोन उमेदवार असल्याने सरळ थेट लढती होत आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे शहरातील 14 प्रभागांमध्ये एकूण 28 जागांसाठी निवडणूक असून, त्यापैकी 18 जागा बिनविरोध ठरल्या आहेत. तीन प्रभागांतील चार जागांवर 2 डिसेंबर रोजी मतदान झाले असून, 49.24 टक्के मतदान नोंदवले गेले. आता 20 डिसेंबरला उर्वरित चार प्रभागांतील खालील पाच जागांवर मतदान होणार आहे.
प्रभाग क्रमांक 2 अमध्ये भाजपच्या विभावरी दाभाडे (भाजप), अपक्ष ऋतुजा भगत, शिवसेनेच्या वीणा कामत, प्रभाग क्रमांक 7 बमध्ये भाजपचे चिराग खांडगे (भाजप) आणि अपक्ष सूरज कदम, प्रभाग क्रमांक 8 अमध्ये राष्ट्रवादीच्या मनीषा म्हाळसकर आणि अपक्ष स्नेहल म्हाळसकर, प्रभाग क्रमांक 8 बमध्ये राष्ट्रवादीचे सुदाम शेळके आणि अपक्ष अमोल शेटे, प्रभाग क्रमांक 10 बमध्ये राष्ट्रवादीच्या संगीता खळदे आणि अपक्ष सपना करंडे (अपक्ष) यांच्या लढत होणार आहे.
आज सत्र न्यायालयाच्या निकालाची शक्यता
प्रभाग 7 अ मधील उमेदवार वैशाली बाळासाहेब तांबोळी यांनी अर्ज मागे घेतला नसताना निवडणूक निर्णय अधिकारी यांनी या उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याचे जाहीर केले. खोटी सही करून उमेदवारी अर्ज परस्पर कोणी मागे घ्यायला लावला?, उमेदवार प्रत्यक्ष हजर नसताना आणि उमेदवाराची सहमती नसताना अर्ज कसा काय मागे घेतल्याचे जाहीर केले? आदी प्रश्नांचा खुलासा निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना तांबे यांनी समाधानकारक न दिल्याने त्यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. त्याबाबत ऍड. असिम सरोदे यांनी पक्षकाराची बाजू आज न्यायालयात मांडली. सुनावणी पश्चात आता उद्या (गुरुवारी) न्यायालयाचा निकाल आल्यावरच तळेगाव दाभाडे नगर परिषद निवडणुकीच्या एकंदरीत प्रक्रियेचे स्वरूप समोर येईल.