

अमिन खान
तळेगाव दाभाडे: लोणावळा नगर परिषद पाठोपाठ आता तळेगाव दाभाडे नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पक्ष महायुतीऐवजी स्वतंत्र लढण्याचा उंबरठाव्यावर आले आहेत. गेले दोन दिवस दुसऱ्या फळीतील स्थानिक नेते आणि कार्यकर्ते यांनी बड्या नेत्यांनी घेतलेल्या महायुतीच्या निर्णयाला तीव्र विरोध करून राजकीय वातावरण तापविले. त्यानंतर नेत्यांनी त्यांच्याशी चर्चा करून निर्णयाचा फेरविचार करून स्थानिकांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तळेगाव दाभाडे नगर परिषद निवडणुकीसाठीही महायुतीचा फॉर्म्युला बारगळण्याचे संकेत आज दिवसभरात झालेल्या राजकीय उलथापालथीतून समोर आले आहेत.
अद्याप एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही
तळेगाव नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र भरण्याच्या पहिल्या तिन्ही दिवसांत एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नाही. अनेक इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरून तयार ठेवले असले, तरी पक्षाकडून अधिकृत उमेदवारांची घोषणा न झाल्याने सर्वजण प्रतीक्षेत आहेत. निवडणुकीसाठी फक्त तीन दिवस बाकी असताना महायुतीतील गोंधळ आणि महाआघाडीच्या स्पष्ट भूमिकेमुळे तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
महाआघाडी सरसावली, महायुती निर्णयाच्या प्रतीक्षेत
दरम्यान, महाआघाडीने स्पष्ट भूमिका घेत सर्वच्या सर्व जागांवर लढण्याचा निर्णय घेतला असून, याची औपचारिक घोषणा पत्रकार परिषदेत केली आहे. त्याउलट महायुतीचा ठाम निर्णय केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनेच जाहीर केला असून, महायुतीबाबत भाजपकडून कोणतेही अधिकृत अंतिम निर्णयाचे निवेदन किंवा माहिती जारी करण्यात आली नाही. त्यामुळे तालुक्यातील निवडणुकांंच्या राजकीय अनिश्चिततेत आणखी भर पडली आहे. राजकीय अभ्यासकांच्या मते, जोपर्यंत दोन्ही पक्षांचे नेते एकत्रितपणे किंवा एकाच दिवशी महायुतीचा अंतिम निर्णय जाहीर करणार नाहीत, तोपर्यंत तालुक्यातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार नाही.
महायुतीचा प्रारंभिक निर्णय आमदार सुनील शेळके आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी तालुक्यातील विकास आणि राजकीय स्थैर्य लक्षात घेऊन घेतला होता. मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांनीही या निर्णयाला सकारात्मक प्रतिसाद दिला होता. मात्र, गेल्या 48 तासांत पक्षातील असंतोष आणि नाराजीमुळे या निर्णयावर गंडांतर आले आहे. दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या उद्याच्या पत्रकार परिषदेनंतरच अंतिम चित्र स्पष्ट होईल आणि तळेगावच्या राजकीय रणधुमाळीची खरी सुरुवात होईल.
लोणावळा फॉर्म्युला फेल; तळेगाव दाभाडे निर्णयाच्या प्रतीक्षेत
लोणावळा नगर परिषदेतील महायुतीचा फॉर्म्युला फेल झाल्यानंतर तळेगाव दाभाडेतही त्याच परिस्थितीची पुनरावृत्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर, वडगाव मावळ नगर परिषदेची परिस्थिती अद्याप अनिर्णित आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष या दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेण्याची शक्यता प्रबळ आहे.
आज होणार चित्र स्पष्ट
विश्वसनीय सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे नगर परिषद निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टी स्वतंत्रपणे लाढविण्याच्या निर्णयावर आले आहेत. गतिमान विकास आणि तालुक्यातील राजकीय संघर्ष कमी व्हावा या हेतूने आमदार सुनील शेळके आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी महायुतीचा चांगला निर्णय घेतला होता. या निर्णयाला मुख्यमंत्री फडणवीस आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अजित पवार यांनीही सकारात्मक होकार दिला होता. मात्र, 48 तासांच्या आत महायुतीच्या अंतिम निर्णयावर गंडांतर आले आहे. पक्षातील नाराजांनी गेले दोन्ही दिवस महायुतीच्या निर्णयाविरोधात राळ उठविल्याने बड्या नेत्यांना त्यांच्या भावनांचा मान राखणे अपरिहार्य झाले असल्याची चर्चा आहे. उद्या दोन्ही पक्षांचे बडे नेते अंतिम निर्णय जाहीर करणाऱ्या पत्रकार परिषदा घेणार असल्याने त्यानंतरच खऱ्या अर्थाने निवडणुकीची रणधुमाळी सुरू होईल.
मोठ्या घडामोडींचे संकेत
तळेगाव दाभाडे नगर परिषद निवडणुकीतील महायुतीचा फॉर्म्युला फिस्कटण्याचे संकेत मिळत असतानाच नाराजांच्या रोषाला सामोरे जाण्याच्या घडामोडी सुरू आहेत. आज रात्री उशिरापर्यंत त्यावर चर्चेतून ठोस भूमिका आकार घेईल. महायुतीच्या निर्णयात नगराध्यक्षपद हा सर्वांधिक संवेदनशील मुद्दा ठरला आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी ज्यांनी अंतिम फेरीपर्यंत मजल मारली, त्यापैकी कोण पक्षांतर करणार, ती कोण कोण बंडखोरी करणार, पहिल्या यादीतील जाहीर उमेदवार कुणाकडे जाणार यावर खलबते सुरू आहेत. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) यांच्यातील महायुतीबाबतचा अंतिम निर्णय अद्याप जाहीर झालेला नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन सुरू असून, स्थानिक नेत्यांनीही आपापली मते उघडपणे व्यक्त करायला सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी दिलेला हिरवा झेंडा फडकणार की फडफडणार, यावरच सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.