Pune Navale Bridge Accident : पुणे अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत, CM फडणवीसांची घोषणा

Devendra Fadnavis : 8 जणांचा मृत्यू, आग लागलेल्या दोन ट्रकमध्ये अडकली कार
pune navale bridge accident
Published on
Updated on

pune navale bridge accident

पुणे : पुणे शहरातील नवले पूल परिसरात झालेल्या एका भीषण अपघातात काही निष्पाप नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केले दुःख

या अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स पोस्टद्वारे तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘पुण्यातील नवले पुलावर झालेल्या अपघातात काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी आहे.’

मृतांना श्रद्धांजली आणि आर्थिक मदत जाहीर

मुख्यमंत्री फडणवीस यांनी या अपघातात प्राण गमावलेल्या व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली असून, त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी आहोत, असे नमूद केले आहे. तसेच त्यांनी या अपघातातील मृतांच्या वारसांना ५ लाख रुपये इतके आर्थिक सहाय्य देण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.

कंटेनरने १५ ते २० वाहनांना चिरडले

पुणे-बंगळूर महामार्गावरील नवले पुलाजवळ आज सायंकाळी ५ वाजून २० मिनिटांच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार, ब्रेक फेल झालेल्या एका भरधाव कंटेनरने स्वामीनारायण मंदिरासमोरील नवले पुलापासून ते वडगाव पुलापर्यंतच्या रस्त्यावर जवळपास १५ ते २० वाहनांना धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, कंटेनरच्या धडकेमुळे अनेक वाहने चक्काचूर झाली, तर एका चारचाकीमधील सीएनजी टँकचा स्फोट होऊन मोठी आग लागली.

अपघाताचा थरार आणि जीवितहानी

प्राथमिक माहितीनुसार, एका कंटेनरचा ब्रेक फेल झाला. ब्रेक फेल झालेल्या या कंटेनरने वडगाव पुलापर्यंत येईपर्यंत दुचाकी, चारचाकी आणि दोन प्रवासी बससह १५ ते २० वाहनांना उडवले. दरम्यान, दोन कंटेनरच्या धडकेत मध्यभागी असलेल्या एका चारचाकी गाडी चिरडली गेल्याने त्यातील सीएनजी टाकीचा स्फोट झाला. यामुळे मागच्या कंटेनर, चारचाकी गाड्या आणि पुढील कंटेनरमधील सर्व साहित्य जळून खाक झाले.

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात सुरुवातीला ८ जणांचा मृत्यू झाला असून १५ हून अधिक जण जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाकडून तात्काळ रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले. यावेळी सुमारे दहा ते पंधरा अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

प्रत्यक्षदर्शी ऋषिकेश सुवासे म्हणाले, ‘वाहनांच्य धडकेच्या आवाज ऐकून पाहिले तर वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी होती. कंटेनरने आधीच ९-१० जणांना धडक दिली होती. कंटेनर आणि कारच्या धडकेनंतर कारचा सीएनजी ड्रम फुटला.’

दुसरे प्रत्यक्षदर्शी अनुज देशमुख यांनी सांगितले, ‘आम्ही मदतीसाठी धावलो, पण आगीमुळे वाचवणे शक्य झाले नाही. नवले पुलाजवळ अपघात सातत्याने होत आहेत, हा एक अतिशय धोकादायक पूल आहे.’

रेस्क्यू ऑपरेशन आणि वाहतूक कोंडी

पुणे पोलीस, महामार्ग पोलीस, महापालिका प्रशासन आणि अग्निशामक दलाकडून संयुक्तपणे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. क्रेनच्या मदतीने चक्काचूर झालेली वाहने हटवण्याचे काम सुरू आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वतः घटनास्थळी भेट दिली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. आगीत होरपळलेल्या मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डीएनए टीम आणि फॉरेन्सिकची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. अपघातामुळे पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. शिंदेवाडीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून सर्व वाहने सर्विस रोडने वळवली जात आहेत.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, ‘सुरुवातीला ६ जणांचा मृत्यू झाला. तर १५ हून अधिक जण जखमी झाले. मृतदेहांची पुष्टी करण्यासाठी फॉरेन्सिक टीम आणि आणखी एक पथक तैनात करण्यात आले आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवले आहे. मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही. प्रकरणाची चौकशी सुरू आहे.’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news