

संतोष शिंदे
पिंपरी: दारू पिऊन वाहन चालवणे हे अपघाताचे एक गंभीर कारण ठरत असून, त्यातून अनेकांचे प्राण गेले आहेत. काही जखमी झाले, तर काहींना अपंगत्वाला सामोरे जावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिस मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कठोर भूमिका घेत ‘तळीराम शोध मोहीम’ राबवत आहेत. दरम्यान, मागील आठ महिन्यांत तब्बल 3 हजार 4 चालकांना दारू पिऊन वाहन चालवताना पकडण्यात आले आहे.
दारूच्या नशेत जीवाशी खेळ
दारू पिल्यानंतर वाहन चालवणारा चालक स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात टाकतो. दारू मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम करून निर्णयक्षमता कमी करते, दृश्य लक्ष विचलित करते आणि वाहनाचा वेग नियंत्रणात राहत नाही. वाहतूक विभागाच्या आकडेवारीनुसार, देशातील प्रत्येक दहापैकी एक अपघात हा मद्यपी चालकामुळे होतो. विशेषतः रात्री बार आणि रेस्टॉरंटमधून बाहेर पडणारे चालक अधिक धोकादायक ठरत आहेत.
दारू पिऊन वाहन चालवणे हा गंभीर गुन्हा आहे. अपघातांमधील मृत्यूंच्या आकडेवारीत हे चिंतेचे कारण बनले आहे. नागरिकांचे प्राण वाचवणे हा आमचा प्रमुख उद्देश आहे. यासाठी रात्रीच्या वेळी नाकाबंदी, वाहन तपासणी आणि जनजागृती मोहिमा नियमित सुरू आहेत.
विनय कुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड
दंड आणि शिक्षेचा अनोखा आदेश
हिंजवडी परिसरात 22 जुलै रोजी दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या एका चालकाविरुद्ध कारवाई करण्यात आली. न्यायालयीन सुनावणीत त्याला 10 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तसेच, दारू पिऊन वाहन चालवण्याचे दुष्परिणाम जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सिग्नलवर एक हजार पत्रके वाटण्याची सामाजिक शिक्षा देण्यात आली.
कायदा काय सांगतो..
भारतीय मोटार वाहन कायद्यानुसार, वाहनचालकाच्या रक्तात 100 मिलीलीटरमध्ये 30 मिलीग्रामपेक्षा जास्त अल्कोहोल आढळल्यास तो दंडनीय अपराध मानला जातो. पहिल्यांदा गुन्हा सिद्ध झाल्यास सहा महिन्यांचा तुरुंगवास किंवा दंड, तर वारंवार गुन्हा करणाऱ्यांना एक वर्षांपर्यंत शिक्षा आणि परवाना निलंबनाचा धोका असतो. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अशा प्रकरणांमध्ये न्यायालयीन कारवाई करून अनेक चालकांचे परवाने निलंबित केले आहेत.
कारवाईचा बडगा
पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी अपघात रोखण्यासाठी सातत्याने विशेष मोहिमा राबवल्या आहेत. शहरातील विविध ठिकाणी नाकाबंदी करून मद्यपी चालकांवर बेथ-ॲनालायझरद्वारे अल्कोहोल तपासणी करण्यात येते. मागील आठ महिन्यांत 3 हजार 4 चालकांकडे ठरवलेल्या मर्यादेपेक्षा अधिक अल्कोहोल आढळल्याने त्यांच्या विरोधात गुन्हे नोंदविण्यात आले.
विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे धडे
वाहतूक पोलिस केवळ दंडात्मक कारवाई करत नाहीत, तर जनजागृतीवर भर देताना दिसत आहेत. ‘एक दिवस शाळेसाठी’ या उपक्रमांतर्गत पोलिसांनी शाळा, कंपन्या आणि वसतिगृहांमध्ये जाऊन वाहतूक नियमांचे धडे दिले आहेत. या मोहिमेसाठी 20 विशेष टीम कार्यरत असून, त्या नियमितपणे जनजागृती करत आहेत.
चालकांनी घ्यावयाची काळजी
दारू पिल्यानंतर वाहन चालवू नका; टॅक्सी, कॅब किंवा मित्रांची मदत घ्या.
प्रवाशांनी मद्यपी चालकासोबत प्रवास करू नये.
मद्यपी चालक दिसल्यास त्वरित 112 वर माहिती द्या.
पार्टी, फंक्शनमध्ये मड्रायव्हर ऑन ड्युटीफ ही संकल्पना वापरा.
दारूच्या नशेत काय घडते
प्रतिसादक्षमता सुमारे 25 टक्क्यांनी कमी होते.
वाहनाचा वेग नियंत्रणात राहत नाही.
दृष्टी आणि मेंदूचा समन्वय बिघडतो.
अपघाताचा धोका चार पटीने वाढतो.