

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरांमध्ये इच्छुकांची भाऊ गर्दी झालेली आहे. दरम्यान, आरक्षण सोडतीनंतर आपला सेफ प्रभाग निवडून अनेकांनी कामे सुरू केली आहेत. त्यामध्ये सहज उपलब्ध होणारा आणि अल्पावधीत अनेकापर्यंत पोहचणारा सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात इच्छुक चमकू लागले आहेत. विशेष म्हणजे आरक्षणानंतर प्रभागांचे चित्र स्पष्ट झाल्याने मित्रांना आपले राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी एकमेकांविरोधात उभे ठाकावे लागणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीच्या अगोदरच सोशल मीडियावर वातावरण तापू लागले आहे.(Latest Pimpri chinchwad News)
महापालिकेची निवडणूक तब्बल आठ वर्षांनी होत आहे. त्यामुळे गेले अनेक वर्षे तयारी सुरू असलेल्या इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. कधीही न दिसणारे आजी माझी नगरसेवक, पदाधिकारी अचानक सोशल मीडियावर सक्रिय झाले आहेत. त्यामुळे त्यांचे पाठीराखेदेखील जोशात आले आहेत. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून आपला प्रभाग निवडून इच्छुक कामाला लागले आहेत. सेफ प्रभागाची चाचपणी करून कार्यकर्ते जमवू लागले आहेत.
दरम्यान, नागरिकांच्या दारोदारी फिरण्याऐवजी एकाचवेळी अनेक ठिकाणी पोचणारे एकमेव साधन म्हणजे सोशल मीडिया. त्यामुळे सध्या सर्वत्र सोशल मीडियाची धूम पाहायला मिळत आहे. एवढेच नव्हे, तर सोशल मीडियावरील पोस्टमध्ये एकमेकांविषयी टोमणेबाजी करण्याचे प्रकार सुरू झाले आहेत.
यंदा मीच, भाऊ फिक्स, जनतेच्या मनातला, भावी नगरसेवक अशा आशयाच्या पोस्ट झळकू लागल्या आहेत. या माध्यमातून इच्छूक आपणच कसे योग्य हे ठासवण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्येष्ठ, माजी नगरसेवकदेखील यामध्ये मागे नाहीत. इच्छुकांचे पाठीराखेदेखील या मिडीया वॉरमध्ये मागे नसल्याचे दिसून येत आहे. आपल्या नेत्याच्या प्रसिद्धीसाठी विविध क्लृप्त्या लढविल्या जात आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरातील बहुतांश बोर्डामध्ये एकाच कुटुंबातील अनेक जण इच्छुक असतात. त्यामध्ये सख्खे अथवा चुलत भाऊ, काका-पुतणे, मामा-भाचे अशीदेखील इच्छुक आहेत. त्यामुळे नातेवाईकांच्या बैठका सुरू झाले आहेत. त्याचप्रमाणे गेल्यावर्षी तुम्ही निवडणुका लढवली होती, यंदा आमचा माणसाला पाठिंबा द्या, या विषयाची चर्चा गावकी भावकीमध्ये सुरू असल्याचे दिसून येते.