

तळेगाव दाभाडे: तळेगाव दाभाडे शहरात सुरक्षेच्या दृष्टीने ठोस पावले उचलण्यात आली आहेत. शहरातील वाढती गुन्हेगारी, अपघात, ट्रॅफिकच्या समस्या यांच्यावर नियंत्रण ठेवावे याकरिता शहरात 29 ठिकाणी 33 खांबांवर एकूण 86 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यापैकी 57 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित झाले आहेत. 2025 मध्ये हे काम हाती घेण्यात आले होते. व जानेवारीअखेरपर्यंत काम पूर्ण होणार असल्याची माहिती मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी दिली.
या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे शहरात होणाऱ्या गैरकृत्यांवर आळा घालण्यात पोलिस प्रशासनाला मदत होणार आहे. तळेगाव दाभाडे शहराची वाढती लोकसंख्या व त्याचबरोबर वाढत जाणारे चोरी, घरफोडी, अपघात, ट्रॅफिकच्या समस्या या सर्व प्रकारांवर पोलिस प्रशासनाचे लक्ष राहणार आहे. या कॅमेर्याद्वारे देखरेखीसाठी दोन नियंत्रण कक्ष (सर्वर रूम) नियोजित करण्यात आले आहेत. यामध्ये तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशन येथे मुख्य नियंत्रण कक्ष उभारणी अंतिम टप्प्यात आली आहे. तर सुभाष चौक येथे लवकरच काम सुरू होईल, अशी माहिती नगरपरिषदेच्या विद्युत विभागाच्या अभियंता स्मिता म्हस्के यांनी दिली.
हे सीसीटीव्ही बसवल्यानंतर पुढील 2 वर्षे याच्या देखभालीचे कंत्राट संबंधित कंत्राटदाराकडे असणार आहे. त्यानंतर पुढील 3 वर्षांसाठी वार्षिक देखभालीचे कंत्राट 73 लाख 72 हजार 733 रुपये इतके असून, टप्प्याटप्प्याने ही रक्कम दिली जाणार आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी 1 कोटी 63 लाख 83 हजार 853 रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली आहे.
या ठिकाणचे सीसीटीव्ही कार्यान्वित
घोरावडी गणपती चौक, डोळसनाथ मंदिर, जिजामाता चौक, मारुती मंदिर चौक, लिंब फाटा, पाताळेश्वर मंदिर, मौलाई मंदिर, बेटी बचाव पुतळा, खांडगे पेट्रोल पंप, काका हलवाई, तत्त्व हॉटेल, स्टेशन चौक, सेवाधाम हॉस्पिटल, नूतन कॉलेज, स्वराज नगरी, तळेगाव एसटी स्टँड, रेल्वे स्टेशन, मराठा क्रांती चौक, इंद्रायणी कॉलेज, माळवाडी, तळेगाव बॉर्डर, डीपी रोड.
येथील काम अंतिम टप्प्यात
कातवी रोड, मस्करनेस कॉलनी, आंबेडकर कमान, भेगडे तालीम, भेगडे वॉशिंग सेंटर, इंद्रायणी कॉलेज मेन गेट.
तळेगाव दाभाडे सीसीटीव्ही प्रकल्प
एकूण नियंत्रण कक्ष - 2
एकूण सीसीटीव्ही कॅमेरा - 86
चालू कॅमेरे - 56
एकूण खांब - 33
ठिकाणे- 29
पोलिसांचा तिसरा डोळा म्हणून या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा उपयोग होणार आहे. तसेच ट्रॅफिक नियंत्रण, अपघाताची माहिती मिळण्याकरिता, अपघातानंतर रुग्णांना त्वरित मदत करता येणार आहे. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने गुन्हेगारांवर वचक ठेवता येणार आहे.
कन्हैया थोरात, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, तळेगाव दाभाडे