

पिंपरी: निगडी येथील दुर्गा देवी टेकडी परिसरात गुरुवार (दि. 8) जलतरण तलावाजवळ बिबट्यासदृश वन्यप्राण्याचा वावर आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने दुर्गा टेकडी तात्काळ बंद करण्यात आली असून, परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार बिबट्याने कुत्रा किंवा अन्य प्राणी खाल्ल्याने तो अस्वस्थ होता. घटनेची माहिती मिळूनही पोलिस यंत्रणा उशिरा घटनास्थळी दाखल झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर वनविभागामार्फत सदरील क्षेत्राची पाहणी करून व आधुनिक उपकरणांचा वापर करून तसेच ट्रॅप कॅमेरे लावून सत्यता पडताळणीचे काम तात्काळ सुरू करण्यात आले आहे. सध्या पोलिसांनी परिसरात नाकाबंदी केली असून नागरिकांना टेकडी परिसरात प्रवेशास मनाई केली आहे.
दरम्यान, बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाची पथके घटनास्थळी दाखल झाली असली, तरी अद्याप बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलेले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर वन क्षेत्रपाल अधिकारी, शिवाजीनगर कार्यालय यांनी तातडीने दखल घेऊन संबंधित ठिकाणी पिंजरे लावण्यात यावेत, तसेच बिबट्याला जेरबंद करण्यासाठी तात्काळ आणि प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवले असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वन विभागाला तातडीची कारवाई करण्याची मागणी केली आहे. सरद क्षेत्रातील नागरिकांनी विशेषत: झाडीच्या ठिकाणी आणि वनक्षेत्रात अंधारात फिरणे टाळावे, पहाटे व रात्रीच्या वेळी फिरताना विशेष खबरदारी घेणे, लहान मुले, वृद्धांना घराबाहेर एकटे सोडू नये. घर उघडे ठेवू नये, घराच्या आजूबाजूला मोठे गवत, झुडपे, वाढू देवू नये, आपल्या पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी. बिबट्यांचा कुर्त्यांवर हल्ला करण्याचा धोका अधिक असल्यामुळे नागरिकांनी आपले पाळीव कुत्रे शक्यतो बंदिस्त ठेवावेत तसेच फिरायला नेण्यास टाळावे. अशा प्रकारची माहिती मिळाल्यास 1926 क्रमांकावर संपर्क करावा.
दिसलेला प्राणी नक्की बिबट्याच आहे का, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. आम्ही वन विभागाला कळविले आहे. वन विभागाने याठिकाणी पाहणीदेखील केली आहे. ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. जोपर्यंत स्पष्टता येत नाही, तोपर्यंत उद्यानात नागरिकांनी येऊ नये, असे आवाहन केले आहे
महेश गारगोटे, मुख्य उद्यान अधिकारी, मनपा, पिं.चि