

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी मतमोजणी 16 जानेवारीला होणार आहे. ही मोजणी शहरातील विविध आठ ठिकाणी होणार आहे. चिंचवड येथील ब क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत असलेल्या प्रभागांची मतमोजणी चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे तर, क क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत असलेल्या प्रभागांची मतमोजणी इंद्रायणीनगर, भोसरी येथील संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा संकुल येथे होणार आहे.
शहरातील एकूण 32 प्रभाग असून, प्रत्येक 4 प्रभागांसाठी एक निवडणूक निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. मतदान 15 जानेवारीला सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होणार आहे. दुसऱ्या दिवशी 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे.
मतमोजणी प्रक्रियेकरिता प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाअंतर्गत स्ट्राँग रूम व मतमोजणीची ठिकाणे निश्चित करण्यात आलेली आहेत. या सर्व ठिकाणांना पोलिस विभागाकडून आवश्यक ती मान्यता प्राप्त झालेली आहे.
नागरिक, राजकीय पक्षांनी सहकार्य करावे
मतदान व मतमोजणी प्रक्रिया शांततेत, पारदर्शक व सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून सर्व आवश्यक तयारी करण्यात आली आहे. नागरिकांनी व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन निवडणूक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.