

पिंपळे निलख: पिंपरी-चिंचवड शहर, उपनगरांमधील बहुतांश रस्त्यांवर अवैध अवजड तसेच क्षमतेपेक्षा अधिक साहित्याची वाहतूक करताना वाहने आढळून येत आहेत; परंतु या वाहनांना रिफ्लेक्टर नसल्याने मागे चालणार्ऱ्या वाहनांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. बहुतांश वाहनचालक जास्तीचे भाडे मिळण्यासाठी अतिरिक्त बोजा चढून वाहतूक करत आहेत. यामुळे शहरातील रहदारीच्या मार्गावर अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. अशा वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
पिंपळे निलख ड्ढपिंपळे सौदागर मुख्य बीआरटी रस्त्यावर बांधकाम साहित्यातील सळ्या व पाइप यांचे नियमबाह्य, धोकादायक वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आले. वाहनाच्या आकारापेक्षा दुपटीने बाहेर निघालेल्या लोखंडी सळ्या, ना रिफ्लेक्टर, ना चेतावणी फलक यामुळे मागून येणाऱ्या वाहनांना अक्षरशः धोक्याच्या सावलीतूनच मार्ग काढावा लागत आहे.
रात्रीच्या वेळी तर परिस्थिती आणखी भीषण बनते. क्षमता ओलांडणारी मालवाहतूक, नियमांकडे पूर्ण दुर्लक्ष आणि वाहतूक विभागाची निष्क्रियता या सर्व बाबींवर संतप्त नागरिकांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बीआरटी मार्गातून प्रवास करणारा छोटा टेम्पो लोखंडी सळ्या घेऊन जाताना दोन्ही बाजूला इतर वाहनचालक अथवा नागरिकांच्या लक्षात येईल, असा कोणताही सूचना फलक अथवा रिफ्लेक्टर न लावता वाहतूक करताना दिसून आला.
अक्षरश: पदपथावरून चालणार्ऱ्या नागरिकसुद्धा टेम्पो जाताना प्रवास करू शकत नाही एवढ्या त्या सळ्या खाली आलेल्या असताना वाहतूक पोलिस याकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहेत. आशा पद्धतीने धोकादायक वाहतूक करणार्या वाहनचालकांमुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
आम्ही यावर काळजी घेऊ. शक्यतो माल रहदारीच्या वेळी लोड न करता कसा पोहोचवता येईल याकडे लक्ष दिले जाईल. पुढे रिफ्लेक्टर व चेतावणी फलक लावूनच गाडी सोडली जाईल, याची विशेष काळजी घेतली जाईल.
बाबू लोहार, व्यावसायिक
आम्ही ताबडतोब अशा वाहतुकीला प्रतिबंध घालण्यासाठी व्यावसायिकांना नोटीस बजावणार आहे. रस्त्यावर अवैध वाहतूक सुरू असल्याचे दिसून आल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. वाहनांच्या रिफ्लेक्टर व चेतावणी फलक याबाबत तपासणी मोहीम राबविणार आहोत. वाहनचालकांनीदेखील धोकादायक पद्धतीने वाहतूक करू नये.
सुदाम पाचोरकर, पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग