

भोसरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांची अवस्था दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे. विद्यार्थ्यांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र सध्या अनेक शाळांमध्ये पाहायला मिळत आहे. इंद्रायणीनगर येथील शाळेची दुरवस्था झाल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. शाळेतील तुटलेली खेळणी, धुळीचे वर्ग आणि तारेने बांधलेले नळ आदी मूलभूत समस्यांपासून विद्यार्थ्यांची सुटका महापालिका प्रशासन कधी करणार, अशी मागणी विद्यार्थी व पालकवर्गातून होत आहे.
श्रीवैष्णो माता प्राथमिक विद्यामंदिर, इंद्रायणीनगर शाळेची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. शाळेतील मुलांच्या सुरक्षेची आणि मूलभूत सुविधा पुरवण्याची जबाबदारी असलेल्या प्रशासनाचे ढिसाळ कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना सोसावा लागत आहे. शाळेतील बहुतेक खेळणी तुटलेल्या अवस्थेत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. तुटलेल्या खेळण्यांमुळे अपघाताचा धोका कायम असून, पालकांमध्येही नाराजी व्यक्त होत आहे.
वर्गखोल्यांमध्ये सर्वत्र धूळ साचलेली असून, विद्यार्थ्यांना श्वसनाचा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्वच्छतेच्या अभावामुळे आरोग्याच्या समस्या वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तसेच शाळेतील नळ व टोंट्या तुटलेल्या असून, त्या तारेने बांधलेल्या आहेत. यामुळे मुलांना स्वच्छ पाणी मिळण्यात अडथळे निर्माण होत आहे. पाणी साठवणूक करण्यासाठी दोन टाक्या ठेवलेल्या आहेत. पण टाकीत जोडलेला जॉईंट कापला आहे.
पाण्याअभावी शौचालय बंद
पाण्याच्या टाकीत पुरेसा पाणीसाठा नसल्याने शौचालय वापर बंद आहे. यामुळे मुलींची कुचंबणा होत आहे. शाळेत संगणक आणि प्रयोगशाळेसाठी काही महिन्यांपूर्वी पत्र्याचे छत टाकून खोली बांधण्यात आली होती. त्याला वीजपुरवठा नाही; तसेच फिटिंग केली नाही. त्यामुळे खोलीविना वापर आहे. तसेच शाळा, पत्राशेडमध्ये आहे. शाळेत उच्च दाब वीजवाहक तारा आहे आणि मुले त्याच ठिकाणी खेळतात. नाल्याच्या कडेला शाळा असल्याने सतत दुर्गंधीचा त्रास विद्यार्थ्यांना होत आहे. पालक व स्थानिक नागरिकांनी संबंधित विभागाने या समस्यांकडे तातडीने लक्ष देऊन दुरुस्तीची पावले उचलण्यात यावीत, अशी मागणी होत आहे.
मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी आवश्यक असलेल्या या साधनांची दुरुस्ती न झाल्याने विद्यार्थ्यांना योग्य वातावरण मिळत नाही. शाळेतील अडचणींबाबत पत्र व्यवहार केला आहे. अद्यापही त्यावर कसलेही दखल घेतली नाही.
श्री वैष्णो माता प्राथमिक विद्यामंदिर, पालक शिक्षक संघ
शाळेतील स्थापत्यविषयक सर्व कामे करण्यात आली आहेत. या ठिकाणी नो पार्किंगचे फलकदेखील बसविण्यात येणार आहेत. नवीन फारशा, कॉम्प्युटर रूम, शिक्षकांसाठी रूम तसेच मुख्याध्यापकांसाठी केबिन बांधण्यात आली आहे. रंगरंगोटी तसेच शाळेची सीमाभिंतीची उंची वाढविण्यात आली आहे.
ललित हेडाऊ, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य